
>> शिरीष कणेकर
परममित्र (म्हणजे जो आम्हाला सतत फाटय़ावर मारतो तो!) संजय दत्तात्रय मोने त्याच्या मुखमौक्तिकांसाठी प्रसिद्ध आहे. संजय बोले, दल हाले. ‘संजयउवाच’ असं म्हणतात तो हाच संजय असावा. (एकदा त्याच्या घरी कोणी नसताना बॉब क्रॅस्टो, मॅक्मोहन व महंमद रफीचा चुलतभाऊ यांनी पार्टी केली होती. त्यात रफीचा चुलतभाऊ हेमंतकुमारची गाणी गायला होता, (इति संजय उवाच.) संजय अभिनय करतो, नाटक-मालिका-चित्रपट लिहितो, चिकनची बर्फी – अंडय़ाचा गोडा शिरा – चिकन किंवा मटणाची कलेजी घालून केलेलं कुळिथाचं पिटलं असले कानावरूनही न गेलेले पदार्थ बनवतो. (व सुकन्याला खायला घालतो. यालाच हलाहल पचवणं म्हणतात. उगीच नाही सुकन्या अधूनमधून नीलकंठ दिसते.) पण मला विचाराल तर श्रवणीय, संस्मरणीय, संग्रहणीय व पुनरोच्चारणीय असे बोलणे हे त्याचे जीवितकार्य आहे. त्याला जगण्यासाठी (स्वतः बोलायला) खुमासदार वाक्ये लागतात; प्राणवायू नव्हे.
ही त्याच्या तोंडची काही मर्मभेदक विधाने माझ्या छातीवर गोंदून घेतलीत. (एकदा हॉस्पिटलात ‘एक्स-रे’साठी मी शर्ट काढला तर सगळं विसरून डॉक्टर, नर्स, सिस्टर, वॉर्डबॉय व टेक्निशियन सगळे बघत व वाचत राहिले.)
‘गुहा म्हटल्याबरोबर दोघंच वळून बघणार – सिंह आणि अनिता!’
‘निखिल चोप्रा म्हणजे काय, बी. आर. चोप्रापेक्षा थोडा बरा.’
‘नेपाळमध्ये थिएटरात कोणीच जात नाही, कारण सगळेच गुरखे. सगळेच बाहेर उभे राहणार.’
‘जिंकू नका हो, पण विजयाच्या आसपास जाल की नाही? शेर्पा तेनसिंग नका होऊ, पण नेपाळमध्ये जायला काय हरकत आहे?’
‘आवडताखाद्य प्रकार? – सहकलाकर.’
‘व्हायरल’ न झालेला व म्हणून आम्हा मित्रांपुरता मर्यादित राहिलेला हा अफलातून किस्सा वाचा.
रस्त्याने संजयला एक अनोळखी माणूस भेटला.
‘काय, ओळखलं का?’ त्यानं जिवणी फाकत या कानापासून त्या कानापर्यंत हसत विचारलं.
‘नाही.’ संजय सुरुवातीलाच आटोपतं घेत म्हणाला.
‘असंकाय करता, बघा नं नीट.’
संजयनं नीट बघितलं व पुन्हा नाही म्हटलं.
‘बघा, बघा ओळखाल.’ तो माणूस सोडायलाच तयार नव्हता. संजय आपले राई राईएवढे तुकडे करेल हे त्याच्या गावी नव्हतं. याचाच अर्थ तो संजयला ओळखत नव्हता.
रस्त्यावर तिथंच कडेला एक हातगाडी पडली होती. तिच्यावर असलेल्या कचऱयात सुकलेल्या फुलांचे हार होते. त्यात गुलाबही होते. संजय गेला व त्यातला एक गुलाब घेऊन आला. तो त्या माणसाच्या बटणहोलमध्ये खोवत संजय विजयी मुद्रेने म्हणाला, ‘आताओळखलं. पंडित नेहरू, हो ना?…’
संजय मोनेचं सुकन्या कुलकर्णीबरोबर लग्न झालं. कर्मधर्मसंयोगानं तिथं सुकन्याही उपस्थित होती. लोकविलक्षण योगायोग म्हणजे संजय स्वतः जातीनं हजर होता. मला कणकवलीला बांगडा खायला जायचंय, वाटलं तर लग्नस्थळ कणकवलीच्या जवळ सरकवा, असं तो म्हणू शकला असता. नवऱया-मुलानं अट घातली होती की तो हाफ-पँटीतच लग्नाला उभा राहणार. लग्नाच्या आदल्या रात्री शिवाजी मंदिरला त्याच्या नाटकाचा प्रयोग चालू असताना विंगेत त्याचा मेव्हणा माधव कुलकर्णी (सुकन्याचा दादा) दोन हातात दोन हाफ-पँटी घेऊन उभा होता. मोनेमियाँ सो मोनेमियाँ, माधवमियाँ सुभान अल्ला! राज कपूर-प्रेमनाथनंतर संजय-माधव ही मेव्हण्यांची जोडी गाजल्येय. लग्नात वरण-भात, पुरी-भाजी, पापड-कुरडय़ा, बासुंदी, मसालेभात असा पारंपरिक मेनू न ठेवता संजयनं झुणका-भाकरीचा खास मेनू ठेवला होता. भात होता का? विचारलं असतं तर आमचा दोस्त म्हणाला असता, ‘घरीजाऊन खा.’
अवचित येणाऱया पावसाच्या सरीसारखा संजय आयुष्यात आला व आनंदाची बरसात झाली. वडिलांच्या एकाकी वृद्ध मित्राला रोज न चुकता जेवणाचा डबा पोहोचता करणाऱया संजय मोनेला तुम्ही – आम्ही विक्षिप्त ठरविणार?
‘कणेकर, तुम्ही आयुष्यात एकच चांगला लेख लिहिलात.’ तो मला एकदा कट्टय़ावर म्हणाला.
हा बहुधा दुसरा असेल!
[email protected]




























































