ठसा – प्रा. कुमुद पावडे

>> महेश उपदेव

आंबेडकरी  चळवळीतील अग्रणी कार्यकर्त्या प्रा. कुमुद मोतीराम पावडे यांनी गेली साठ-पासष्ट वर्षे आंबेडकरी विचारविश्वात आपल्या वैचारिक लेखनाने आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचा मूळ पिंड एका मनस्वी कार्यकर्तीचा होता. त्यांनी 36 वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 ऑक्टोबर 1956 रोजीच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या त्या साक्षीदार होत्या. ज्या काळात कमालीची अस्पृश्यता पाळली जात होती, तेव्हा त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला होता. इतकेच नव्हे तर संस्कृत पंडिता म्हणजेच संस्कृत विद्वान म्हणून त्यांनी मान्यता मिळवली होती. त्यांच्या निधनाने चळवळीतील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले अशी प्रतिक्रिया विदर्भात उमटत आहे. त्या केवळ स्त्री चळवळीच्या प्रणेत्या नव्हत्या, तर विदर्भातील स्त्री सक्षमीकरण, स्त्री सजगतासंबंधित आत्मभान आणणाऱ्या चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक होत्या. वयाच्या 85 व्या वर्षीही विविध कार्यात सहभागी होत असत.

द्वारका मठाधीश शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. वेदप्रचारिणी सभेसह विविध संस्था आणि संघटनांच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. विदर्भातील अनेक कार्यकर्ते अन् अभ्यासकांच्या त्या प्रेरणास्रोत राहिल्या. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1938 रोजी झाला. माहेरच्या कुमुद सोमकुंवर यांनी गांधीवादी कार्यकर्ते मोतीराम गुलाबराव पावडे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी लिहिणे सुरू केले. अस्मितादर्श, स्त्री, किर्लोस्कर, साधना, चौफेर आदी मासिकांतून विपुल वैचारिक लेखन केले. ‘अंतःस्फोट’ या त्यांच्या वैचारिक लेखांच्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

1962 पासून त्या आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचे काम करीत होत्या. नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वुमेनच्या संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले. 1992 पासून 2006 पर्यत विविध देशांमध्ये अभ्यास दौरे केले. वडील देवाजीराव सोमकुंवर व आई आंबेडकरी चळवळीत सक्रिय असल्याने त्यांच्यावर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा लहानपणापासून प्रभाव होता.. त्या शासकीय महाविद्यालय, अमरावती येथील संस्कृत विभागाच्या प्रमुख होत्या. राष्ट्रीय दलित महिला महासंघाच्या संस्थापक सदस्यही होत्या. वयाच्या 21व्या वर्षापासून रात्रशाळेतून त्यांनी विनावेतन शिक्षणदानाचे कार्य केले. त्यानंतर नागपूर ते अमरावतीपर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षणदानाचे कार्य केले. 36 वर्षे शिक्षणाचे कार्य करत शासकीय कला व समाज विज्ञान संस्था येथून त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या सामाजिक कार्याची यादीही मोठी आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित करणे व त्याचा प्रचार-प्रसारात त्यांचे मोठे योगदान राहिले.

महाराष्ट्र शासनाचा संस्कृत पंडित पुरस्कार, अमेरिकन वुमन्स ऑर्गनायझेशनचा महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाज गौरव पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार व सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला. ‘लोकमत’नेसुद्धा जीवन गौरव पुरस्कारासह दोनवेळा त्यांचा गौरव केला.

कुमुदताईंनी नागपुरात स्वतः प्रथम आंतरजातीय विवाह केला. 600 पेक्षा जास्त आंतरजातीय विवाह घडवून आणणाऱ्या प्रोग्रेसिव्ह वुमन संस्थेचे  अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. ‘अंतःस्फोट’ हे त्यांचे आत्मकथन त्यांनी लिहिले. वर्धा येथे नुकत्याच झालेल्या 17व्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांना विद्रोही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या विचारधारेचे पुरस्कर्ते मोतीराम पावडे आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचाराच्या पुरस्कर्त्या प्रा. कुमुद पावडे या दांपत्याने एकाच घरात  गांधी- आंबेडकर विचारधारा जोपासली. कुमुदताई यांच्या जाण्याने दोन्ही चळवळींची मोठी हानी झाली आहे.