ठसा – राजूबाई कनकट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भगवान परळीकर

सोलापुरातील  पद्मशाली समाजातील ज्येष्ठ भगिनी, माजी नगरसेविका श्रीमती राजूबाई कनकट्टी यांच्या निधनाने सोलापुरातील एक स्त्री आधार हरपला आहे. त्यांनी सोलापूर शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी इंदिरा महिला सहकारी बँकेची स्थापना केली. या बॅंकेच्या मार्फत महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कर्जाची सोय करून अनेकांना प्रोत्साहित केले. पूर्व भागातील जवळपास तीन हजार महिला विडी कामगारांसाठी प्रथमतः इंदिरा गांधी विडी घरकुल योजना (आताची जुनी विडी घरकुल योजना) राबविण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिले.

विडी घरकुलातील गरीब कुटुंबातील मुलांसाठी या भागात शाळा सुरू केली. तसेच या भागातील गरीब कुटुंबातील मुलांसाठी राजूबाई केशव कनकट्टी न्यू प्रायमरी इंग्लिश स्कूल सुरू केले. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना साखरपेठ भागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. अखेरपर्यंत पद्मशाली महिला मंडळाच्या संस्थापिका म्हणून काम पाहत होत्या. राजूबाई कनकट्टी या माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या. त्यांच्या निधनामुळे कष्टकरी विडी कामगार महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेतृत्व हरपले आहे. ज्यांनी पद्मशाली समाजातील महिलांना स्वतःच्या कष्टावर उभे करण्याचा प्रयत्न केला, त्यांची समाजातील आर्थिक उन्नती केली आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला त्यात श्रीमती राजूबाई कनकट्टी यांचे नाव अग्रभागी होते. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीनुसार कार्य करणाऱ्या राजूबाई कनकट्टी यांचे माहेरचे नाव राजूबाई सिद्रामप्पा कुचन. माहेरीच त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले. त्यांना चांगल्या सहकाऱ्यांची साथ लाभली. त्यामुळे त्यांनी समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’ या उक्तीनुसार सतत कार्यरत राहत त्यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वतःला झोकून दिले. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करणे आणि महिलांच्या हाताला काम देणे. विविध प्रशिक्षण शिबिरे राबवून युवती-महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे या उद्देशाने आपल्या समवयस्क मैत्रिणींना सोबत घेऊन पद्मशाली महिला मंडळाची स्थापना केली.

या मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीस पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या पतपेढीमुळे विडी कामगारांच्या जीवनात आर्थिक पहाट आली. या पतपेढीचे कालांतराने इंदिरा श्रमिक महिला बँकेत रूपांतर झाले. राजूबाई कनकट्टी यांचा  जन्म 26 एप्रिल 1931 रोजी कष्टकरी कुटुंबात झाला होता. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या राजूअक्का यांनी  पूर्व विभाग पद्मशाली महिलासाठी सन 1978 साली पद्मशाली महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळात प्रथमतः राजूबाई, शांताबाई दासरी, सरस्वतीबाई बेत, सुलोचना कोटा, सुलोचना गुंडू या महिला एकत्रित आल्या. या महिला मंडळातून प्रथम शिवणवर्ग सुरू केले. लोकवर्गणीच्या माध्यमातून त्या काळी 25 शिलाई मशीन आणून महिलांसाठी शिवणक्लास सुरू केले. तसेच समाजातील महिलांना एकत्रित आणण्यासाठी इंदिरा श्रमिक महिला सहकारी पतपेढीची स्थापना केली व प्रत्येक विडी कारखान्यात जाऊन 500 महिला सभासद जमा केले. त्यावेळी त्यांचे धाकटे बंधू राजाराम कुचन यांचे सहकार्य लाभले. नंतर 1980 मध्ये त्यांचे बंधू गंगाधरपंत कुचन खासदार म्हणून निवडून आले.

श्रमिक महिलांसाठी विडी घरकुल वसाहत निर्माण करण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाकडून 3000 विडी घरकुल मंजूर करून घेतले. तसेच प्रत्येक सभासदाला आपल्या पतपेढीतून 11हजार रुपये कर्ज देऊन वसाहतीसाठी 25 टक्के रक्कम भरणा करण्यात आली. यशवंत सहकारी सूत मिलमध्ये संचालिका म्हणूनही राजूबाई कनकट्टी यांनी दहा वर्षे काम पाहिले. इंदिरा महिला श्रमिक पतपेढीचे बँकेत रूपांतर करण्यासाठी श्रीमती राजूबाई केशव कनकट्टी व श्रीमती शांताबाई दासरी यांनी खूप परिश्रम घेतले. विडी घरकुल वसाहत 1988 साली विडी महिला लाभार्थ्यांना देण्यात आली. लोक वसाहतीत येऊन राहू लागले, पण त्यावेळी मुलांच्या शिक्षणाचा यक्षप्रश्न पडला म्हणून आपल्या आईच्या नावाने ‘भूदेवीबाई सिद्रामप्पा कुचन बालक मंदिर’ कुचनसाहेबांकडून 11000 रुपये देणगी घेऊन सुरू केले. तसेच ‘लक्ष्मीबाई तिप्पाण्णा दासरी मराठी प्राथमिक शाळा’ व ‘श्रीमती राजूबाई केशव कनकट्टी प्री प्रायमरी स्कूल’ सुरू केले. हे  विद्यामंदिर लोकवर्गणीतून उभे करण्यात आली. अखेरच्या श्वासापर्यंत श्रमिक महिलांच्या उन्नतीसाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजूबाई कनकट्टी यांचा परिचय होता.