>> अतुल जोशी
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाने प. बंगालमधील प्रदीर्घ कम्युनिस्ट राजवटीचा एक अध्याय संपुष्टात आला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि प. बंगाल यांचा राजकीय इतिहास काही शतकांचा आहे. या इतिहासाचे शेवटचे साक्षीदार आणि शिलेदार म्हणून बुद्धदेव भट्टाचार्य यांचा उल्लेख करावा लागेल. प. बंगालमध्ये तब्बल सलग साडेतीन दशके कम्युनिस्ट राजवट होती. त्यात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर नाव येते ते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे.
इ.सन 2000 मध्ये ज्योती बसू यांनी प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्रीपद सोडल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बुद्धदेव यांनी दहा वर्षे आपल्या कामाची छाप तर पाडलीच, पण कट्टर कम्युनिस्ट असूनही प. बंगालमध्ये आर्थिक गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करणारे परिवर्तनशील नेते अशी स्वतःची ओळख निर्माण केली. प. बंगालमध्ये आयटी आणि आयटीसंबंधित उद्योगांत जी मोठी गुंतवणूक आली ती बुद्धदेव यांच्याच कार्यकाळात. सिंगूर येथील टाटांचा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांचाच मोठा वाटा होता. पुढे बुद्धदेव यांच्यानंतरच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत या प्रकल्पाबाबत काय झाले, हादेखील इतिहास आहे. 2011 मध्ये प. बंगालमध्ये हे सत्तांतर झाले आणि तेथील प्रदीर्घ कम्युनिस्ट राजवट, संपुष्टात आली. भट्टाचार्य हे या राजवटीचे अंतिम मुख्यमंत्री ठरले. 1966 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले. बुद्धदेव पुढे राजकारणाच्या पायऱ्या चढतच गेले. 1977 मध्ये प्रथम ते आमदार झाले. 1990 च्या दरम्यान तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनाही धक्का दिला होता. मात्र नंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी झाले होते.
बुद्धदेव हे कडवट कम्युनिस्ट जरूर होते, मात्र प. बंगालमध्ये उद्योग आणि गुंतवणूक व्हावी यासाठी त्यांनी आग्रही प्रयत्न केले. त्यांच्या या धोरणामुळे त्यांच्या पक्षातील काही मंडळी त्यांना ‘बंगाली गोर्बाचेव्ह’ असे संबोधत. काही कॉम्रेड सहकारी त्यांना कम्युनिस्ट कमी आणि बंगाली जास्त असेही हिणवत. बुद्धदेव भट्टाचार्य फक्त कम्युनिस्ट राजकारणी नव्हते तर साहित्य, सिनेमा, नाटक, संगीत अशा अनेक क्षेत्रांत त्यांना प्रचंड रस होता. ते संस्कृत विद्वान आणि लेखक होते. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातील ‘दुसमय’ हे नाटक त्यांनी बसू मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता त्यावेळी लिहिले होते. बंगाली सिनेमा आणि चित्रपट निर्मात्यांविषयी त्यांना विशेष ममत्व होते.
कोलकाता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आज जे प्रसिद्ध ‘नंदन कल्चरल कॉम्प्लेक्स’ आहे ते उभारण्यामागे बुद्धदेवच होते. कट्टर कम्युनिस्ट बुद्धदेव यांचे हे दुसरे रूप होते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. मुख्यमंत्री असतानाही ते त्यांच्या दोन बेडरूम असलेल्या फ्लॅटमध्ये राहत. त्यांच्या निधनाने प. बंगालमध्ये आज ‘इतिहास’ झालेल्या, परंतु कधी काळी ‘इतिहास’ घडविलेल्या कम्युनिस्ट पक्षाचा शेवटचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.