ठसा – उत्तरा बावकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुधीर सेवेकर

ज्येष्ठ सिने-नाटय़कर्मी उत्तरा बावकर यांच्या निधनाने आपण एका प्रशिक्षिक चतुरस्र कलावतीस मुकलो आहोत. त्यांच्या निधनाची यथोचित दखल मात्र मराठी प्रसारमाध्यमांनी घेतली नाही. बहुधा त्या मेनस्ट्रीम सिनेमा पिंवा नाटकवाल्या नव्हत्या आणि त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य आणि रंगकार्य दिल्लीतील आहे त्यामुळे असे झाले असावे. परंतु हिंदुस्थानी रंगभूमीच्या व खासकरून हिंदीभाषी रंगभूमीच्या वाटचालीत जी नाटके मैलाचा दगड मानली जातात त्या नाटकांशी अभिनेत्री म्हणून उत्तरा बावकर यांचा थेट संबंध होता. त्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालय-नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या 1968 सालच्या पदवीधर.

या विद्यालयाच्या ‘रेपरटरी’ अर्थात नाटय़प्रयोग करणाऱ्या मंडळातही त्या होत्या. शिवाय याच विद्यालयात त्यांनी अध्यापनाचेही काम केले. त्यांनी कामे केलेल्या नाटकांची, त्यातील भूमिकांची यादी पहिली की, उत्तरा बावकर या किती मोठय़ा क्षमतेच्या अभिनेत्री होत्या याची कल्पना येते. हिंदुस्थानातील विविध प्रांतांच्या पारंपरिक लोककला, ग्रीक शोकांतिका, शेक्सपीयरची नाटके,  संस्कृत नाटके, बेश्तीयन शैलीची नाटके, स्टान्सलावस्की शैलीची नाटके, आधुनिक नागरी नाटके, संगीत नाटके अशा विविध जॉनर अर्थात जातकुळीच्या नाटकांतून उत्तरा बावकर यांनी समर्थपणे कामे केली.

ज्येष्ठ व्यासंगी रंगकर्मी आणि राष्ट्रीय नाटय़विद्यालयाचे संचालक इब्राहीम अल्काझी यांनी उत्तरा बावकर यांच्यातील नाटय़गुण, संगीतगुण यांना आकार दिला. तत्पूर्वी त्या दिल्लीतीलच एका छोटय़ा नाटय़संचामध्ये गणेश उत्सवांतून वगैरे कामे करीत. राष्ट्रीय नाटय़ विद्यालय आणि तेथील इब्राहीम अल्काझींसह नेमीचंद्र जैन व अन्य गुरुजनांमुळे तसेच सुरेखा सिक्री, अमाल अल्लाना (अल्काझींची कन्या), सविता बजाज, कमलाकर सोनटक्के, मुपुंद नाईक अशा सहाध्यायीचा सहवास, सुधा शिवपुरी, ओम शिवपुरी, बलराज पंडित, वेलणकरसाहेब अशा दिल्लीतील तत्कालीन ज्येष्ठ रंगकर्मींची साथसंगत यामुळे उत्तरा बावकर यांना भरपूर शिकायला मिळाले. त्यामुळेच एक परिपक्व, समंजस रंगकर्मी म्हणून त्यांचा चांगला विकास झाला. कॉकेशियन चॉकसर्कल, मॅकबेथ, ऑथेल्लो, ट्रोजन, थ्रीपेनी ऑपेरा, थ्री सिस्टर्स अशा अनेक विदेशी नाटकांचा सविस्तर अभ्यास आणि त्याच्या हिंदी अनुवादातून कामे यांच्या जोडीलाच यक्षगान, भवानीभवई, तमाशा अशा अस्सल देशी परंपरेतील नाटय़शैलीमुळे परदेशी आणि हिंदुस्थानी अशा दोन्ही रंगभूमीचा त्यांचा सखोल अभ्यास झाला.

तुघलक, अंधायुग, उमरावजान, संध्याछाया, सैंया भये कोतवाल (मराठीतील ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ाचा हिंदी अवतार) अशा अनेक नाटकांतील त्यांची कामे गाजली. त्यांना मुंबईच्या सिनेसृष्टीकडूनही ऑफर्स येत होत्या. पण त्यांनी दिल्लीतच राहाणे पसंत केले. 1984 साली त्यांना त्यांच्या एकूण कामगिरीच्या गौरवार्थ संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मुंबईत त्या खूप नंतर आल्या. ‘एक दिन अचानक’ (दि. मृणाल सेन) या सिनेमात  त्यांच्यासोबत श्रीराम लागू, शबाना आझमी, अपर्णा सेन, अर्जुन चक्रवर्ती असे जानेमाने कलावंत होते. या  सिनेमातील भूमिकेबद्दल त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार 1988 साली मिळाला.

टेलिव्हिजनसाठी त्यांनी केलेल्या ‘तमस’ (दि. गोविंद निहलानी) या मालिकेतील त्यांचे छोटेसेच पण विलक्षण इंटेन्स काम आजही दर्शकांना आठवते. ‘उडान’ (दि. कविता चौधरी), कोरा कागज, कश्मकश जिंदगी की, नजराना, जब लव्ह हुआ अशा अनेक मालिकांतून त्यांनी संस्मरणीय कामे केली.

मराठी चित्रपटात त्यांनी सुमित्रा भावे-सुनील सुखटणकर या  दिग्दर्शक जोडीसोबत दोघी, शेवरी, रेस्टोरंट असे मोजकेच चित्रपट केले; पण ते सगळे संस्मरणीय होते. ‘सूरज’ की अंतिम किरण से, सूरज की पहली किरण तक, असे लांबलचक नाव असलेल्या लेखक सुरेंद्र वर्मा लिखित नाटकातील राणी शीलवतीचे काम तर कुणीच विसरू शकणार नाही. नपुंसक राजाला दोषी न मानता व त्याला कुठलेच प्रश्न न विचारता राज्याच्या वारसासाठी राणी शीलवतीस ‘नियोग’ विधीस अर्थात परक्या पुरुषाची शय्यासोबत करण्यास भाग पाडले जाते, त्या राणीची जी तगमग त्या मंचावर त्या दाखवीत, ती विलक्षण अस्वस्थ करते. मिळालेल्या भूमिकेचा सांगोपांग अभ्यास करून त्या भूमिका साकारीत.