ठसा – आनंद करंदीकर

>> मेधा पालकर

विचारवेध चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ लेखक-विचारवंत, निवडणूक विश्लेषक आणि विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद करंदीकर यांचे नुकतेच निधन झाले.

समाजप्रबोधन, लोकशाहीची सशक्तीकरण प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थेचे विश्लेषण, मतदारांच्या मानसिकतेचे अभ्यासपूर्ण परीक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या विचारपूर्ण लेखनामुळे ‘विचारवेध’ चळवळीला दिशा मिळाली होती. करंदीकर हे ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचे चिरंजीव होते. कुटुंबातील साहित्यिक परंपरेचा वारसा त्यांनी आपल्या विश्लेषणात्मक लेखनातून आणि प्रभावी भाषणातून पुढे नेला. निवडणूक राजकारण, समाजमन, मार्केटिंग तत्त्वे आणि आधुनिक संप्रेषण तंत्रांचा प्रभाव या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून संशोधक व तरुण अभ्यासकांसाठी ती मार्गदर्शक मानली जातात.

लेखन क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे होते. ‘माझ्या धडपडीचा कार्यनामा’, ‘चळवळी यशस्वी का होतात’ आणि ‘धोका’ ही त्यांची महत्त्वाची पुस्तके वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली. याव्यतिरिक्त व्यवस्थापन आणि सल्लागार क्षेत्रातही त्यांनी ‘एमईटीआरआयसी’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले. डॉ. आनंद करंदीकर यांची शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द अत्यंत बहुआयामी होती. त्यांनी बीटेक (मुंबई), एमबीए (आय.आय.एम. कलकत्ता) अशा उच्च पदव्या संपादन करून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी टाटा इकॉनॉमिक कन्सल्टन्सी आणि मुकुंद आयर्न येथे मुंबईत पाच वर्षे नोकरी केली. यानंतर ते सामाजिक चळवळीकडे वळले, जिथे त्यांनी युवक क्रांती दलात सक्रिय सहभाग घेतला, तसेच दोन वर्षे उदगीरमध्ये पूर्णवेळ काम केले. ‘शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहोचवावे?’ हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. स्त्रीमुक्ती चळवळ, लोकविज्ञान चळवळ यातही त्यांचा सहभाग होता, तसेच बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेल्या आदिवासींसोबतच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला व प्रत्येक वेळी त्यांना 15 दिवसांचा कारावास झाला. व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते ‘मार्केटिंग अँड इकॉनॉमेट्रिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (METRIC) या भारतातील सर्वात मोठय़ा आणि 29 देशांत कारभार असलेल्या संस्थेचे प्रवर्तक व 25 वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी INDSEARCH आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात Distinguished Professor म्हणूनही अध्यापन केले. याव्यतिरिक्त, त्यांनी विविध विषयांवर वैचारिक लेखन केले आणि ‘विचारवेध’ या वैचारिक व्यासपीठाचे समन्वयक म्हणूनही काम पाहिले.

युक्रांदच्या माध्यमातून मराठवाडय़ामध्ये सर्वहारा वर्गासाठी त्यांनी आंदोलने केली होती. विवेकनिष्ठ समाजनिर्मितीच्या उद्देशातून गेल्या काही वर्षांपासून करंदीकर पुण्यामध्ये ‘विचारवेध संमेलना’चे आयोजन करत होते.. आंतरजातीय विवाह मोठय़ा प्रमाणात व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील होते. निवडणूक विश्लेषक आणि मार्केटिंग क्षेत्रातील अभ्यासक असलेल्या करंदीकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी.साठी मार्गदर्शन केले होते. त्यांची विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत. आनंद करंदीकर यांच्या निधनाने  सामाजिक क्षेत्र, साहित्य वर्तुळ आणि अभ्यासकांमध्ये हळहळ व्यक्त  करण्यात आली.