
>> द्वारकानाथ संझगिरी
बेलफास्टला गेल्यावर ‘टायटॅनिक म्युझियम’ न पाहता फक्त शहर पाहून परतणं म्हणजे अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’ला भेट देऊन फक्त त्याच्या पीएशी बोलून परत येण्यासारखं आहे. एखादं शहर आपलं ‘अपयश’ कसं मिरवू शकतं, तिथे पर्यटकांना कसं आकर्षित करू शकतं याचं तो म्युझियम हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
टायटॅनिक हा बोटीतला ‘राक्षस’ होता. तो ऍटलांटिक महासागरावर राज्य करणार असं तो राक्षस निर्माण करणाऱ्यांचं मत होतं. ‘‘माणसाचा मेंदू जास्तीत जास्त ‘परफेक्ट’ बनवू शकेल अशी बोट’’ असं तिचं वर्णन केलं जायचं. ती बोट म्हणजे मानवी कुशाग्र बुद्धीचं ‘चिरंजीव’ होण्याचं वरदान मिळालेला राक्षस होता. जणू हिरण्यकश्यपूच! एका हिमगर्भाशी खेळ करायला गेला हा राक्षस आणि तो ‘हिमगर्भ’ या हिरण्यकश्यपूला जलसमाधी देणारा नरसिंह ठरला! 14 एप्रिल 1912 रोजी या टायटॅनिकला जलसमाधी मिळाली, पण अजूनही कुठल्या ना कुठल्या रूपात टायटॅनिकच्या आठवणी जाग्या होतात. कधी एखादी कादंबरी, एखादा भव्य सिनेमा त्या झोपलेल्या आठवणीला उठवतो. एखादा मोठा पराभव, दुर्घटना, चूक यासंबंधातही टायटॅनिकची उपमा दिली जाते.
अशा टायटॅनिकची जन्मकहाणी, तिचं मोठं होणं, वयात येणं, मग प्रवास सुरू होणं, तिचं ते बुडणं, त्यानंतरचा हाहाकार, अश्रू, मरणाऱया माणसांच्या किंकाळय़ा, त्यानंतरची चौकशी आणि शेवटी ऍटलांटिकच्या तळाशी जाऊन विसावलेल्या टायटॅनिकचे अवशेष वगैरे सर्व जीवन प्रवासातून हा म्युझियम आपल्याला घेऊन जातो. बऱयाचदा तो चित्रांच्या माध्यमातून आणि चटपटीत वर्णनातून सांगितला जातो. उदा. ती बोट तयार झाल्यावर जेव्हा पाण्यात जाते तेव्हा तिचं वर्णन ‘शी टूक टू वॉटर ऍज दो शी वेअर इगर फॉर बॅप्टिझम’ (She took to Water as though she were eagar for baptism) असं केलं जातं. म्युझियमच्या एका टप्प्यावर आपण एका छोटय़ा गाडीतून फिरतो. ती गाडी आपल्याला बोट तयार करण्याच्या प्रक्रियेतून घेऊन जाते. हा प्रवास सर्वोत्तम आहे. आजूबाजूच्या फाऊंड्रय़ा, लोखंडकाम, सुतारकाम वगैरे गोष्टी खऱया वाटायला लागतात. बोटीच्या पहिल्या, दुसऱया, तिसऱया दर्जाच्या सुखसोयी काय होत्या याची आपल्याला कल्पना येते. थोडक्यात, या म्युझियममध्ये आपण टायटॅनिकचा एक भाग बनतो. तिच्या सुखाच्या पूर्वार्धाचा आणि मग भेसूर शेवटाचा.
हा म्युझियम पाहिल्यावर मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एकदोन पुस्तकं विकत घेतली. ती चाळताना मला एक अविश्वसनीय गोष्ट वाचायला मिळाली. एक अमेरिकन कादंबरीकार होता. त्याचं नाव मॉर्गन रॉबर्टसन. त्याने ‘फ्युटिलिटी’ नावाची एक कथा लिहिली. ती कथा अशी होती- ‘‘एक कधीही बुडणार नाही असं वाटणारी ‘टायटन’ नावाची बोट. ऍटलांटिक महासागरात वेगाने एका हिमगर्भावर आपटते. त्यातले फक्त काही प्रवासी आणि बोटचालक (क्रू) वाचतात. कारण त्या बोटीवर सर्वांना सुरक्षितपणे बोटीबाहेर घेऊन जाणाऱया लाईफ बोटी नव्हत्या. ही घटना एप्रिलच्या एका रात्री घडते.’’ टायटॅनिक बोट बुडण्यापूर्वी 14 वर्षे आधी ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. म्हणजे 1898 साली. टायटॅनिकच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. याला कल्पकता म्हणायचं की घडणारी गोष्ट आधीच दिसणारी शक्ती? ज्याला इंग्लिशमध्ये ‘प्रिमोनिशन’ म्हणतात.
ही कथा छापून आल्यावर काही वर्षांनी लॉर्ड पिरी (झ्ग्rrग्) आणि जे. ब्रुस इस्मे हे टायटॅनिकसारखी बोट तयार करण्याचं स्वप्न पाहत एकत्रितपणे एका उंची हॉटेलात उंची जेवण घेत होते. जे. ब्रुस इस्मेने हातातला वाईनचा ग्लास उंचावला आणि पिरीला सांगितलं, ‘‘माझ्यासाठी अशी बोट बनव की, त्या बोटीत बसून वाईन पिताना त्यातले ‘सेडिमेंट्स’ हलणार नाहीत. वाईन हिंदकळणार नाही.’’ फक्त वारुणीमध्ये (रेड वाईन) अगदी छोटे छोटे कण (सेडिमेंट्स) असतात. ती पिताना तो ग्लास किंचित हलवत ठेवावा लागतो. त्यामुळे ते खाली बसत नाहीत. लाल वारुणी घेणारा ‘भक्त’ तुम्हाला या गोष्टी सांगू शकेल. तर इस्मेला अशी बोट हवी होती की, जी त्या रक्तवारुणीतले कणसुद्धा हलवणार नाही. ऍटलांटिकच्या लाटांच्या उंचीचा विचार करून दोनशे एकाहत्तर मीटरची बोट करायचं ठरलं. त्या काळात तो आकार मानवी बोटीचा नव्हता, राक्षसी बोटीचा होता.
आता हा जे. ब्रुस इस्मे कोण होता ते थोडक्यात सांगतो. तो व्हाईट स्टारलाइन या कंपनीचा चेअरमन होता. या कंपनीच्या मालकीच्या अनेक मोठय़ा बोटी होत्या. त्यांची तुलना नेहमी ‘कुनार्ड लाइन’ या स्टीमर कंपनीबरोबर चाले. या इस्मेला अशी बोट बनवायची होती जी बी. जी. कुनार्ड कंपनीचं नाक खाली आणेल. आयुष्य कधी काय वळण घेईल, कुणालाही सांगता येत नाही. ही टायटॅनिक बुडली तेव्हा तिथल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी ‘कारपाथिया’ नावाची बोट आली ती या कुनार्ड कंपनीची होती. त्यावेळी ‘टायटॅनिक’वर जोसेफ ब्रुस इस्मे होता. त्याला वाचवलं या कुनार्ड कंपनीच्या बोटीने. कुनार्डचं नाक कापायला गेलेल्या इस्मेचं स्वतःचं नाक कापलं गेलं आणि बुडणाऱया बोटीतून स्वतःला वाचवल्यामुळे या इस्मेची जगभर छीःथू झाली ते वेगळीच.
इस्मेच्या वाईनच्या ग्लासाला ग्लास भिडवणारा लॉर्ड पिरी कोण होता ठाऊक आहे? अत्यंत हुशार नेव्हल आर्किटेक्ट! टायटॅनिक बोट ज्या हार्टलॅंड आणि वुल्फ कंपनीने उभारली तिथे त्याचा दबदबा त्याने तिशी ओलांडण्यापूर्वीच वाढला होता. 1862 साली या कंपनीत तो शिकाऊ इंजिनीअर ऍप्रेन्टिस) म्हणून लागला आणि त्याने पुढे मॅजेस्टिक, टायटॅनिक, ब्रिटॅनिक नावाच्या बोटी डिझाइन केल्या. तो टायटॅनिकच्या त्या सफरीवर असणार होता, पण तो आजारी पडला. त्यामुळे तो गेला नाही. म्हणून तो वाचला. पुढे बारा वर्षांनी क्युबाजवळ असताना त्याला न्यूमोनिया झाला. तो त्यात गेला. त्याला परत मायदेशी त्याने डिझाइन केलेल्या ‘ऑलिंपिक’ बोटीने आणण्यात आलं.
…आणि योगायोग पहा, ऑलिंपिक आणि टायटॅनिक एकाच वेळी तयार करण्यात आल्या. ऑलिंपिक आधी सुरू केली. बोट तयार करताना जी जास्त सुधारणा करावीशी वाटली ती टायटॅनिकवर केली गेली. ती बुडाली, ऑलिंपिक तरली.


























































