उमेद – फिरत्या चाकावरील ज्ञानाचा खजिना; रिक्षाचालक रुजवीत आहेत वाचनसंस्कृती

>> पराग पोतदार

ट्रफिकमध्ये रिक्षातील प्रवासादरम्यानचा वेळ सत्कारणी लागावा आणि प्रवाशांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने पुण्यातील प्रशांत कांबळे बेंगळुरूमधील डॅनियल मरोडोना या रिक्षाचालकांनी सुरू केलेला मोफत ग्रंथालय हा स्तुत्य उपक्रम वाचनसंस्कृती रुजवीत आहे.

बेंगळुरूमधील डॅनियल मरोडोना आणि पुण्यातील प्रशांत कांबळे हे दोघेही रिक्षाचालक रिक्षात मोफत ग्रंथालय सुरू करून वाचनसंस्कृती रुजवीत आहेत. त्यांनी त्यांच्या रिक्षाला फिरत्या ग्रंथालयात रूपांतरित केले असून ते तेथे प्रवाशांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देत आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे ते दोघेही चर्चेत आहेत. वाचकांना दर्जेदार साहित्याचे खाद्य पुरवत असल्यामुळे कौतुकासही पात्र ठरत आहेत. या कामगिरीमुळे ते रिक्षा प्रवाशांना वाचनासाठी आणि विचार करण्यासाठीदेखील प्रोत्साहित करताना दिसत आहेत.

प्रवासादरम्यान वेळ सत्कारणी लागावा आणि प्रवाशांना वाचनाची गोडी लागावी, हा या उपक्रमामागील त्यांचा मुख्य उद्देश आहे. बेंगळुरूमधील डॅनियल मरोडोना हे कन्नड मीडियमचे विद्यार्थी होते. मात्र ते नोकरीसाठी गेलेल्या मुलाखतीत नाकारले गेले. इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. मात्र त्यांनी हार न मानता 10 वर्षे सातत्याने इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे सुरू ठेवले आणि इंग्रजी विषयात प्रवीण झाले. कालांतराने त्यांनी ऑटोरिक्षा घेतली आणि आज महिन्याला 40 हजार रुपये कमवीत आहेत. त्यांनी रिक्षात अनेक प्रकारची पुस्तके ठेवली ज्यात अनेकदा विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांचाही समावेश आहे. ज्यामध्ये फिलॉसॉफी, सायकॉलॉजी या पुस्तकांचादेखील समावेश आहे. त्यांनी प्रवाशांना पुस्तके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक फलक लावलेला आहे, ज्यात ‘सर्वांसाठी विनामूल्य, तुमची इच्छा असल्यास घ्या’ असे लिहिले आहे.

याविषयी डॅनियल मॅरोडोना म्हणतात, एक आशादायक विचार तुमचे वाईट दिवस पालटू शकतो. पुण्यातील रिक्षाचालक प्रशांत कांबळे यांनादेखील वाचनाची आवड असल्याने ट्रफिकमध्ये अडकल्यावर वाचण्यासाठी त्यांच्या ऑटोरिक्षात काही पुस्तके ठेवत असत. हळूहळू त्यांना जाणवले की त्यांच्या काही प्रवाशांनाही पुस्तके वाचायला आवडत आहेत.

एके दिवशी कांबळे यांची प्रियंका चौधरी यांच्याशी भेट झाली, ज्या एका ओपन लायब्ररी उपक्रमासाठी काम करतात. चौधरी यांनी कांबळे यांना त्यांच्या ऑटोरिक्षात एक छोटे ग्रंथालय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.

कांबळे गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या ऑटोरिक्षात फिरते ग्रंथालय चालवत आहेत. प्रवास करताना हजारो लोकांना त्यांच्या ग्रंथालयाचा फायदा झाला आहे आणि ते मोफत पुस्तकेदेखील वाटतात. काही प्रवाशी त्यांच्या उदात्त उपक्रमासाठी पुस्तके दानदेखील करतात.

याविषयी प्रशांत कांबळे म्हणाले, “माझ्या ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ग्रंथालयाची कल्पना खूप आवडली आहे. त्यांच्यापैकी बरेच जण ऑटोरिक्षा भाडय़ाने घ्यायची असेल तर मला फोन करतात. कारण मी माझ्या गाडीत पुस्तके घेऊन जातो.”

“आमचा प्रयत्न सामान्य लोकांमध्ये मराठी भाषा लोकप्रिय करण्याचा आहे. आमच्या खुल्या ग्रंथालय प्रणालीच्या मदतीने आम्ही लोकांना मराठीतील पुस्तके उपलब्ध करून देत आहोत. या उपक्रमाद्वारे आम्ही एक फिरते ग्रंथालयदेखील सुरू केले आहे आणि प्रशांत कांबळे यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आमच्या मदतीने, आता त्यांच्या ऑटोरिक्षात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत आणि वाचक त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत.”