विज्ञानरंजन – मरुभूमी

>> विनायक

हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी’ असं कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात. गोव्यासारख्या हिरव्यागार माडांच्या आणि खळाळणाऱ्या पश्चिम सागराच्या सान्निध्यात आयुष्यभर राहण्याची संधी लाभलेल्या कवीला असं वाटणं अगदी साहजिक आहे, परंतु पृथ्वीवर एक तृतीयांश भागात म्हणजे सुमारे 33 टक्के भूभागावर ना हिरवळ ना पाणी! कोणी म्हणतात, हा रखरखाट आता 43 टक्क्यांपर्यंत गेलाय.

आधी पृथ्वीवर सुमारे 75 टक्के भाग समुद्राने व्यापला आहे. उरलेल्या 25 टक्क्यांच्या भूपृष्ठाचा विचार केला तर त्यातलेही 33 टक्के गेले तर हिरवाई आहेच कितीशी? त्यातच वेगवेगळय़ा कारणांनी वन विनाश होतच आहे. उद्याच्या पृथ्वीचं चित्र 75 टक्के जलसाठय़ामुळे अंतराळातून ‘निळय़ा’ ग्रहाचेच दिसेल, पण ‘डाऊन टू अर्थ’ किंवा भूमीवर उतरल्यावर सारी तगमग जाणवू लागेल. त्याचं गांभीर्य ‘प्रगत’ म्हणवणाऱ्या माणसाला नाही हे नववं किंवा दहावं आश्चर्यच! डेझर्ट किंवा वाळवंटाला आपल्याकडे ‘मरुभूमी’ अशी संज्ञा आहे. पूर्णपणे जलहीन, शुष्क अशा भूभागाला आपण वाळवंट म्हणतो. जगभर अशी विशाल वाळवंटं आहेत. हिंदुस्थानातलं ‘थर’चं वाळवंट लहान नाही. राजस्थान राज्याचा 61 टक्के भाग त्याने व्यापला आहे. याच वाळवंटातून वाहणारी आणि सतलज नदीशी संगम करणारी सरस्वती नदी वाढत्या वाळवंटाने ‘गुप्त’ केली असा एक सिद्धांत मांडला जातो. मरुभूमी केवळ सुकी (शुष्क) किंवा तप्त आणि कोरडीच असते असं नाही. जिथे वनसंपदा किंवा गवतही उगवत नाही ती ‘मरुभूमी’ बर्फाळ, अतिशीतसुद्धा असू शकते. इंग्लिशमध्ये त्याला ‘कोल्ड डेझर्ट’ म्हणतात. लॅटिनमधील मूळ ‘डेझर्टम’ म्हणजे त्यागलेला भाग यावरून ‘डेझर्ट’ शब्द आलाय. मग तो वालुकामय असो किंवा हिमप्रदेश. त्याला तप्त किंवा शीत ‘डेझर्ट’ म्हटलं जातं. ‘वाळवंट’ या शब्दात वालुकामय प्रदेश एवढाच अर्थ येतो.

… तर अशी दोन्ही प्रकारची ‘डेझर्ट’ मिळून पृथ्वीचा 33 टक्के भाग व्यापला आहे. शीत मरुभूमीमध्ये अंटार्क्टिका हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाचा भूभाग सर्वाधिक म्हणजे 14,200,000 चौरस किलोमीटर इतका प्रचंड आहे. दुसरा क्रमांक उत्तर ध्रुवीय म्हणजे आर्क्टिक प्रदेश. तिथल्या ‘कोल्ड डेझर्ट’ची व्याप्ती थोडी कमी म्हणजे 13,900,000 चौरस किलोमीटर इतकी आहे. या दोन शीत मरुभूमी वगळता बाकीची वाळूची किंवा सूक्ष्म कणांच्या रेतीची ‘वाळवंटे’च आहेत. त्यांची क्रमवारी लावली तर पहिल्या दहा वाळवंटांत आपलं राजस्थानातलं ‘थर’चं वाळवंट येत नाही.

आफ्रिकेमधलं सहारा वाळवंट 9,200,000 चौरस किलोमीटर, ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट, ज्याने ऑस्ट्रेलिया खंडाचा खूप मोठा मध्यभाग व्यापलाय, त्याचं क्षेत्रफळ 2,700,000 चौरस किलोमीटर भरेल. अरबस्तानातील वाळवंट 2,330,000 चौरस किलोमीटर, तर आशिया खंडातील सर्वात मोठं ‘गोबी’ वाळवंट 1,295,000 चौरस किलोमीटर पसरलंय. आफ्रिकेमधलंच कलाहारी वाळवंट 900,000 चौरस किलोमीटरचं, तर दक्षिण अमेरिकेतील पॅन्टेगॉनियन डेझर्ट 6,73,000 चौरस किलोमीटर आहे. सीरियामधलं वाळवंट 500,000 चौरस किलोमीटरचं असून उत्तर अमेरिकेतील ग्रेट बेसिन हे 4,90,000 चौरस किलोमीटरचा भूप्रदेश व्यापतं. वाळवंटी भागात पाऊस अर्थातच खूप कमी पडतो. एक ते जास्तीत जास्त 20 सेंटिमीटर पाऊस वर्षभरात झाला तर कुठली हिरवळ आणि कुठलं पाणी! दक्षिण अमेरिका खंडामधल्याच ऍक्टाकॅमा वाळवंटात 1570 ते 1970 या 400 वर्षांत पाऊसच पडला नव्हता असं म्हटलं जातं. असा पर्जन्यशून्य प्रदेश मरुभूमी होणारच.

जेव्हा पाऊस वर्षानुवर्षे दडी मारतो तेव्हा सुकलेली जमीन, तापलेले खडक आणि प्रचंड उष्णता याला वेगवान वाऱ्यांची साथ मिळाली की, खडकांचे पृष्ठभागही ‘खरवडले’ जातात. त्यापासून निर्माण झालेले कण वारंवार होणाऱ्या वादळांच्या घुसळणीमुळे अधिकाधिक सूक्ष्म बनतात आणि वाऱ्यामुळेच निर्माण झालेल्या या वाळूच्या डोंगरांचे सुंदर घडय़ा घातल्यासारखे थर तयार होतात. त्याला ‘सॅन्डडय़ुन’ म्हटलं जातं. राजस्थानात जैसलमेरकडे मोटारीने गेलात तर ठायी ठायी अशा ‘सॅन्डडय़ुन’ नक्षीच्या वालुकामय गालिचा पसरलेला दिसतो. गुजरातच्या कच्छ भागातही जे ‘रण’ आहे, तेथील भूपृष्ठावरची माती टाल्कम (फेस) पावडरसारखी मऊ असते. आम्ही 1999 च्या खग्रास सूर्यग्रहणासाठी जागेची पाहणी करायला भूजच्या पुढे गेलो होतो तेव्हा अचानक वाळवंटी वावटळ उठली आणि त्या मृदू, शुष्क मातीचा ढीग कारच्या टपावर जमा झाला.

त्यामुळेच वाळवंटातील लोक डोळे-कान-नाक वगैरे झाकणारे कपडे वापरतात. उन्हाळय़ात वाळवंटी भागात 50 अंश सेल्सियसपर्यंत तापमान गेलं की, ‘सनस्ट्रोक’ होण्याची धास्ती असते. त्यामुळे एकावर एक चुण्या (प्लीट्स) असलेल्या पारंपरिक वेशाचा उद्देश स्वसंरक्षण हाच असतो. तरीही अशा भागात माणसं राहतात. वाळवंटातल्या क्वचितच असलेल्या पाणथळ तलावांजवळ थोडी हिरवळ असते. घरे सराटय़ांची किंवा काटेरी झुडपांची बनवतात. कच्छमध्ये त्या झोपडय़ांना ‘भुंगा’ म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातही आदिवासींची घरे आहेतच. प्राप्त नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेत कमी पाणी आणि उष्णता सहन करत माणसांची, काही प्राणी-पक्षी-सरपटणाऱ्या जिवांची आणि झाडाझुडपांची ‘वस्ती’ मरुभूमीवरही असते. ‘कोल्ड डेझर्ट’मध्ये पेंग्विन आणि सील आढळतात. पृथ्वीवरच्या या नैसर्गिक रचना कधी मोहक, तर कधी दाहक!