
>> स्पायडरमॅन
भन्नाट कल्पना आणि अनोख्या शोधांमुळे जगभरातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेल्या इलॉन मस्क यांची चिंता वाढवणारी एक घटना नुकतीच घडली. अत्याधुनिक रोबोट ऑप्टिमस बनवण्यासाठी सध्या मस्क यांची कंपनी जिवापाड मेहनत घेत आहे. मात्र नुकतीच चिनी कंपनी Xpeng ने आपला अत्याधुनिक असा ह्युमनॉईड ‘आयरन’ सादर करून जगाला थक्क केले आहे. आयरनची निर्मिती म्हणजे ऑप्टिमसच्या निर्मितीला एक खुले आव्हान असल्याचे मानले जात आहे.
आयरनची निर्मिती करताना Xpeng कंपनीने विशेष खबरदारी घेतलेली आहे. मानवाप्रमाणे दिसणाऱ्या या रोबोट्सची लोक सहजपणे गळाभेट घेऊ शकणार आहेत. त्याच्या बरोबर वावरताना माणसांवर कोणताही ताण येणार नाही, सहजपणा जाणवेल याचीदेखील काळजी घेतली आहे. त्यासाठी आयरनला खोटय़ा मांसपेशी आणि अत्यंत मुलायम त्वचादेखील बसवण्यात आली आहे. त्याचा स्पर्श हा अगदी मानवी स्पर्शाप्रमाणे असणार आहे. हे रोबोट मानवाप्रमाणेच हालचालीदेखील करतील. मानवाप्रमाणे दिसणारे हे रोबोट तयार करणाऱ्या Xpeng कंपनीने पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारच्या रोबोटची निर्मिती सुरू केली आहे.
2026 च्या शेवटापर्यंत मोठय़ा प्रमाणावर या रोबोट्सची निर्मिती सुरू झालेली असेल. 2030 पर्यंत प्रतिवर्षी 10 लाख आयरन रोबोट्स बनवले आणि विकले जातील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे सध्या कार बाजारात तेजी आहे, अगदी त्याप्रमाणे लवकरच लोक घरोघरी हे रोबोट्स खरेदी करतील असा दावा कंपनीने केला आहे. सध्या हे रोबोट्स दुकाने, मॉल अशा ठिकाणी ग्राहकांचे स्वागत करणे आणि पर्यटकांना मार्गदर्शन करणे, सहल घडवणे व माहिती देणे अशी कामे करणार आहेत. Xpeng कंपनी वेगाने प्रगती करत असून सध्या ती चीनमध्ये इलॉन मस्क यांच्या टेस्ला या कार कंपनीलादेखील जोरदार टक्कर देत आहे.


























































