
>> दिलीप जोशी
एक ऑक्टोबरला जागतिक ‘ज्येष्ठ’ नागरिक दिवस असतो. गेल्या वर्षी जगभर उसळलेल्या कोरोनाच्या लाटेने अनेक वृद्धांना तुलनेने जास्त त्रास झाला तर कितीतरी दगावले. अर्थात अशा पॅन्डॅमिक’ने ‘वयस्कर’ असणे म्हणजे काय याची व्याख्याच बदलली आहे की काय असं वाटावं अशाही दुर्घटना घडल्या. काही चांगली तरुण, निरोगी वाटणारी माणसंही कोविडच्या प्रादुर्भावाला बळी पडली आणि वयवृद्धी आणि आजाराची तीक्रता याकडे पाहावयाचा जगाचा दृष्टिकोन बदलायला हवा का? असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात अशा महामारीच्या लाटा वारंवार येऊ नयेत हीच अपेक्षा. 2020 च्या आरंभी कोविडचा तडाखा बसला तरी वर्षभराने जगात त्याविरुद्धचं लसीकरणही सुरू झालं. वैद्यकीय पेशातील मंडळींनी आणि इतरही अनेक सेवा कर्मचारी अक्षरशः ही लढाई लढले.
गेल्याच वर्षी ज्येष्ठांबाबतचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम जाहीर झाला तो 2020 ते 30 हा काळ ‘ज्येष्ठांचं दशक’ म्हणून साजरं करण्याचा. इथे ‘साजरं करणे’ म्हणजे सणासुदीसारखे नव्हे, तर या काळात जगभरच्या ज्येष्ठांकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या समस्या कोणत्या त्या समजून घेणे, त्यांच्यासाठी अधिक सोयीसुविधा निर्माण करणे वगैरे.
तसा हिंदुस्थान सध्या तरी तरुणाईचा देश आहे. राष्ट्राच्या उत्साही प्रजेची संख्या जास्त असणे हा एक अमूल्य ठेवा असतो. कारण या वयातली माणसं व्यक्तिगत, सामाजिक आणि देशासाठी बरंच कार्य उमेदीने करू शकतात. त्यांच्या वयाची आणि त्याबरोबर प्राप्त झालेल्या शारीरिक क्षमतेची ऊर्जा त्यांच्याकडे असते.
ज्येष्ठांची गोष्ट निराळी. जगात साधारणपणे साठीनंतरच्या लोकांना वृद्ध मानलं जातं. अनेक देशांत निवृत्तीचं वय तिथल्या वातावरणानुसार गरजेनुसार 65 ते 70 असतं. ही देशसापेक्ष गोष्ट आहे. तरीही साठीचा उंबरठा ओलांडलेल्यांची गणना ‘ज्येष्ठा’तच होते. पूर्वी हिंदुस्थानातील प्रजेचं सरासरी वय 25 च्या आसपास होतं. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत अशीच स्थिती होती. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची साठी किंवा षष्टय़ब्दीपूर्ती समारंभाने साजरी केली जायची. त्यावेळी आपल्याकडे निवृत्तीचं वयही अठ्ठावन्न असल्याने साठीच्या व्यक्तीला ‘आपलं आता वय झालं’ असे वाटायला लागायचं, पण निवृत्ती आणि पेन्शन वगैरे गोष्टी मुख्यत्वे सरकारी कचेऱ्यांत काम करणाऱ्यांसाठी असायच्या.
खासगी नोकरी करणारे उद्योग-व्यवसायात असलेले शेतकरी किंवा अगदी कलाक्षेत्रातले अथवा लेखक अशा मंडळींना निवृत्तीची मर्यादा नसायची. ‘फ्री-लान्स’ काम करणारे त्यांना शक्य असेपर्यंत कार्यरत राहत. आजही राहतात. साठी पार केलेले अनेक ज्येष्ठ अगदी तरुणांच्या नाही, पण उमेदीने काम करताना दिसतात. या ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा तरुणाईला मिळतो, तर तरुण वर्गाच्या नव्या काळाप्रमाणे नवं ज्ञान संपादन करण्याच्या प्रयत्नांतून ज्येष्ठांनाही काही शिकता येतं. माझ्या माहितीचे एक लघुउद्योजक वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी कॉम्प्युटर वापरायला शिकले. कारण तेव्हाच ते नवं तंत्रज्ञान आलं होतं.
हिंदुस्थानपेक्षा इतर अनेक देशांत लोकसंख्येच्या प्रमाणात वृद्धांचं प्रमाण बरंच आहे. गेल्या पन्नास वर्षांत वैद्यकीय व्यवसायात झालेल्या संशोधनाने अनेक दुर्धर विकारांवर ताबा मिळाला असून अनेक रोगांचं समूळ उच्चाटन झालं नसलं तरी चांगल्या उपचारांनी ज्येष्ठांना सुखद जीवन (क्वॉलिटी लाईफ) जगता येतंय. प्रगत आणि श्रीमंत देशांत वृद्धांचा विचार सार्वजनिक वाहतुकीपासून सर्वत्र होत असल्याने त्यांचा निवास आणि प्रवासही विनासायास होतो. शिवाय या देशांच्या एकूण संपन्नतेच्या तुलनेत लोकसंख्याही कमी आहे. त्यात वृद्धांची संख्या जास्त झाली तरी त्यांना सर्वांची काळजी घेणं शक्य असतं.
आपल्यासारख्या विकसनशील आणि प्रचंड लोकसंख्येच्या देशापुढची आव्हानं निराळी असतात. त्यामुळे एकाच मोजपट्टीने जगातील सर्वांसाठीच्या सोयीसुविधा मोजता येत नाहीत. या गोष्टी खऱ्या असल्या तरी ज्येष्ठांकडे अधिक लक्ष देण्याचं धोरण आपल्या सरकारचंही आहे. त्याची कार्यवाही योग्य प्रकारे झाली तर वयस्कर लोकांचं जीवनमान सुधारेल.
हा लेख लिहीत असतानाच बातमी आली की, देशात सुमारे 53 लाख वृद्धांना म्हणजे साठीपुढच्या लोकांना ‘अल्झायमर्स’ किंवा विस्मरणाच्या आजाराने ग्रासले आहे. वाढत्या वयाबरोबर शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया कमी होणे (रिफ्लेक्स), दृष्टी मंदावणे, ऐकायला कमी येणे, सांधे दुखणे अशा गोष्टी अनेकांना जाणवू लागतात. त्यातच हातचं नैमित्तिक काम थबकल्याने एक प्रकारचं रितेपण येते. आपण अडगळ तर ठरत नाही ना असे निराशेचे विचारही येऊ शकतात, परंतु या काळात स्वतःच स्वतःला कार्यरत ठेवण्याची कला आत्मसात केली तर वेळ चांगला जातो. शक्य तेवढं फिरणं, बेताचा पण नियमित व्यायाम, नेमस्त आहार आणि निरपेक्ष वृत्तीने जीवनाकडे पाहण्याची वृत्ती विकसित केली तर वृद्धत्वही छान असू शकते. हे साध्य केलेली अनेक ज्येष्ठ मंडळी ठाऊक आहेत. त्यांची ऊर्जा तरुणाईलाही स्फूर्ती देते. अशी माणसं सर्व क्षेत्रांत असतात.
2020 ते 30 या काळात वृद्धांच्या जागतिक संख्येत 56 टक्के वाढ अपेक्षित असून भावी काळातल्या आजी-आजोबांना नव्या जिद्दीने आदर द्यावा आणि त्यांनीही कौतुकाने पुढच्यांना प्रोत्साहन द्यावं. पूर्वी एकत्र कुटुंबात ते आपोआप घडायचं. आता व्यापक सामाजिक, ग्लोबल कुटुंबात ते साधावं लागेल. दोन-तीन पिढय़ा सामंजस्याने नांदल्या तर जग अधिक ‘श्रीमंत’ होईल!
























































