
देवेंद्र भगत । मुंबई
कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी मुंबईत मिरवणूक आणि विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास बंदी राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मंडळे आणि घरगुती गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या यावर्षी पाच पटींनी वाढवून तब्बल 170 करण्यात आली आहे. शिवाय मूर्ती विसर्जनाला नेण्यासाठी पालिकेची वाहने सोसायट्यांच्या गेटवरही मूर्ती स्वीकारणार आहेत.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी गणेशोत्सवात गर्दी झाल्यास प्रसार वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेने आतापासूनच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी 166 कृत्रिम तलावांची यादी तयार असल्याची माहिती पालिकेचे उपआयुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बर्डे यांनी दिली. ही संख्या 170 पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी केवळ 32 कृत्रीम तलाव होते. याशिवाय कंटेनमेंट झोन आणि सील इमारतींमधील मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्रातच व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश याआधीच देण्यात आले आहेत. तसेच मंडपात निर्जंतुकीकरण, स्क्रिनिंगची व्यवस्था असावी, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्क वापरावा, शक्य असल्यास ऑनलाइन दर्शनाची सुविधा, आरोग्य विषयक जनजागृती करावी, आरती-भजन-कीर्तन असल्यास गर्दी करू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत.
विसर्जन कृत्रिम तलावातच करा!
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून यातील 2 हजार 700 मंडळे मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूला मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. तर दोन लाखांवर घरांतही गणेशोत्सव साजरा केला जातो. या मूर्ती नैसर्गिक ठिकाणी विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल असतो. मात्र यावर्षी गर्दी केल्यास कोरोनाचा धोका संभवतो.
त्यामुळे पालिकेने केलेल्या व्यवस्थेनुसार घरगुती दोन लाखांवर मूर्तीपैकी दीड लाखांवर मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यातआले आहे. सार्वजनिक मूर्ती 4 फुटी आणि घरगुती मूर्ती 2 फुटी ठेवून पर्यावरणपूरक असावी. मूर्तींचे विसर्जन समुद्र, तलाव किंवा नैसर्गिक ठिकाणी न करता कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
आतापर्यंत फक्त 451 मंडळांना परवानगी
22 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होणार असला तरी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आतापर्यंत केवळ 1 हजार 43 अर्ज आले आहेत. 20 जुलैपासून ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 158 अर्ज डबल आहेत. तर अटींची पूर्तता करणार्या 885 पैकी 451 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 52 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहे. यानुसार पात्र अर्जांपैकी 56.84 टक्के परवानग्या देण्यात आल्या आहे. सध्या 382 अर्ज परवानगीच्या प्रकियेत आहेत.
कोरोनाचा धोका असल्यामुळे विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी 170 कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबईकरांनी गर्दी टाळण्यासाठी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे. विसर्जनासाठी पालिका मोठ्या प्रमाणात अन्य सुविधाही निर्माण करणार आहे. – नरेंद्र बर्डे, उपआयुक्त, गणेशोत्सवाचे समन्वयक
पालिकेने जाहीर केलेली नियमावली स्वागतार्हच आहे. सार्वजनिक मंडळांकडून यांचे पालन होईलच. यामध्ये राज्य सरकारनेही गृहनिर्माण सोसायट्यांना विसर्जनासाठी व्यवस्था करणे आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी निर्देश देण्याची गरज आहे. – अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, गणेशोत्सव समन्वय समिती



























































