नवल! – खारट आणि अळणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अरूण

मुंबईसारख्या शहरातली 1970 पर्यंत मोठय़ा प्रमाणात दिसणारी मिठागरे हळूहळू आटत गेली. जिथे खाडीचं पाणी उन्हात आटवून मीठ ‘पिकवायचं’ ती मिठाची आगरच दुर्मिळ झाली. कारण स्वच्छ मीठ कारखान्यांमध्ये तयार होऊ लागलं. त्यातलं आयोडिनचं प्रमाण संतुलित ठेवणं सोपं गेलं. त्यामुळे नैसर्गिक मीठ-शेती संपत चालली. अजूनही काही ठिकाणी मिठागरांचं अवशेष दिसतात, पण ते किती काळ टिकतील कोण जाणे!

मीठ ही माणसाची एक प्रमुख गरज आहे. मिठाशिवाय केवळ जेवणच नव्हे, तर जीवनही ‘अळणी’ होऊन जाईल. आपल्या देशात प्रत्येक तिखट, चमचमीत पदार्थांत मीठ असतंच. पदार्थ कमी मिठामुळे अळणी झाला तर जेवणात मजा येत नाही. अनेक पदार्थांत मीठ कमी पडलं तर नंतर टाकता किंवा घालता येतं, पण ही द्रव्य (लिक्वीड) पदार्थांची गोष्ट. घट्ट पदार्थात नंतर मीठ टाकणं कसं जमणार? पापड किंवा थालीपीठात मीठ टाकता येत नाही. ते पीठ भिजवतानाच योग्य मापात पडणं गरजेचं असतं.

युरोप-अमेरिकेतल्या आहारात ‘स्पाईस’ किंवा मसाले आपल्यासारखे झणझणीत नसतात, पण मिरपूड आणि मिठाचा वापर तिकडेही होतोच. पूर्णपणे अळणी जेवण फक्त डॉक्टरी सल्ल्यानुसारच एखाद्या रुग्णाला ‘पथ्य’ म्हणून सांगितलं जातं. आजकाल वाढत्या ब्लडप्रेशर आजारामुळे आहारातलं मीठ अगदी कमी असावं असं म्हटलं जातं. काही जण बिनमिठाचे पदार्थही आवडीने (किंवा नाइलाजाने) खातात. मधुमेहींना साखरेशिवाय चहा-कॉफी घ्यावी लागते तसंच हे मिठाचं पथ्य.
एरवी आपल्या देशात प्रत्येक जण सरासरी 10 ते 12 ग्रॅम मीठ खातो. हे प्रमाण सवय बदलून पाच ग्रॅमपर्यंत खाली आणावं आणि उच्च रक्तदाबाची धास्ती कमी करावी, असा एक मतप्रवाह आहे, परंतु जिभेच्या ‘चवी’चं काय करायचं? ‘रेसिपी’चे कार्यक्रम करणारेही सावधपणे ‘चवीपुरतं मीठ’ वापरायला सांगतात. आता प्रत्येकाची चव क्षमता निराळी आणि मिठाचा वापरही.

युरोप-अमेरिकेत लोक प्रकृतीबाबत जागरुक किंवा अधिक ‘हेल्थ कॉन्शस’ असतात. त्यामुळे त्यांचा रोजचा मिठाचा वापर 6 ते 8 ग्रॅम इतकाच असतो. चिनी लोक मात्र चांगलं 17 ग्रॅम मीठ खातात. आपल्याकडच्या लोणची-पापडात जास्त मीठ वापरलं जातं.

जगात दरवर्षी 11 कोटी 10 लाख टन मीठ माणसं वापरतात, परंतु एकूण 27 ते 30 कोटी टन मिठाच्या उत्पादनापैकी हे प्रमाण फारच कमी आहे. उत्पादित मिठापैकी 94 टक्के मीठ उद्योगांच्या उपयोगासाठी, तर केवळ 6 टक्के स्वयंपाकासाठी वापरलं जातं. पण नव्या युगात तेही जरा जास्तच होतंय म्हणतात!