नवलच! – माचू पिक्चू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण

शीर्षक वाचून हा एखादा चिनी-जपानी किंवा कोरियन शब्द आहे का? असं वाटेल, पण हे चक्क दक्षिण अमेरिका खंडातील पेरू (खरा उच्च्चार ‘परू’) देशातल्या एका प्राचीन शहराचं नाव आहे. आपल्याकडे जसे गुजरातमध्ये डोळावीरा, लोथळ किंवा आपल्या महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्हय़ात हडप्पा संस्कृतीचे अवशेष प्राचीन वसाहतींच्या रूपाने सापडले आहेत तसेच ‘इन्का’ या संस्कृतीमधलं एकेकाळचं सुसज्ज डोंगरी नगर ‘माचू पिक्चू’. त्याला नगरदुर्गही म्हणता येईल.

तशी या ‘इन्का’ मंडळींची संस्कृती ऐतिहासिक परिमाणांच्या दृष्टीने मोहेंजोदडो-हडप्पासारखी अतिप्राचीन म्हणता येणार नाही. कारण हा काळ 1438 ते 1533 असा आहे. या काळात परू देशात निर्माण झालेलं हे साम्राज्य दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिकच्या किनारपट्टीवर सुमारे तीन हजार किलोमीटर पसरलं होतं. त्याला चौभागांचे म्हणजे ‘तावान्तित्सुयू’ राज्य म्हणत. केचुआ त्यांची भाषा होती, पण ‘नवल’ म्हणण्यासारखं त्यात काय होतं? असे कुणी म्हणेल. कारण अशी अनेक साम्राज्यं पृथ्वीतलावर नांदली आणि काळाच्या ओघात गडप झाली. मग ‘इन्का’चं वैशिष्टय़ काय? तर ‘इन्का’चा जो काळ सांगितला जातो, त्याच्या कितीतरी आधीपासून हिंदुस्थानात धातुशास्त्र, स्थापत्यशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, औषधीशास्त्र अर्थात आयुर्वेद आणि सुती तसेच रेशमी वस्त्रप्रावरणांमध्ये विलक्षण प्रगती झाली होती. त्यामुळेच जगातल्या सर्व आक्रमकांची नजर या सुवर्णभूमीवर होती.जगाच्या दुसऱ्या टोकाला मात्र पंधराव्या शतकात ‘इन्का’ संस्कृतीचे लोक धातूंचा वापर न करता चलन (पैसा) न वापरता चाकाची वाहनं ठाऊक नसलेल्या स्थितीत उत्तम नगररचना करून सुखाने राहत होते हे नवलच!

दक्षिण अमेरिकेतील अॅन्डीज पर्वताच्या आधाराने विकसित झालेलं हे साम्राज्य बोलिव्हिया, चिली, परू आणि अर्जेंटिनापर्यंत पसरलं होतं. या शांत साम्राज्याला अधिक आधुनिक शस्त्रधारी स्पॅनिश लोकांच्या आक्रमणाने 1533 मध्ये ग्रासलं. त्या युद्धात ‘इन्का’ राजा अॅटॅहय़ुअॅल्पा मारला गेला आणि अवघ्या शतकभराचं हे आगळंवेगळं साम्राज्य संपुष्टात आलं. सुमारे 1 कोटी 20 लाख लोकसंख्या असलेल्या ‘इन्कां’नी नंतर विविध तुकडय़ांमध्ये विभागून नव्या जगाशी जुळवून घेतलं. आता माचू पिक्चू गडावर उरले आहेत ते अल्पकालीन साम्राज्याचे अवशेष.

ते पाहायला जगभरचे पर्यटक येतात आणि ‘यंत्रयुगा’विना इन्का कसे जगले आणि शतकभर तगले, याविषयी आश्चर्य व्यक्त करतात. म्हणूनच ‘इन्का’ला आधुनिक जागतिक विस्मयकारी गोष्टीत स्थान मिळालंय.