अनुबंध – तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अरुणा सरनाईक

झाली का तयारी? या प्रश्नात जीवनाचे विविध अर्थ आहेत. या सर्व तयारींसाठी, अवस्थांसाठी, आपली मानसिकता बदलती असते. ही तयारी ज्याची त्यालाच करावी लागते. मदत जरूर मिळते, पण मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते. यामध्ये भौतिक गोष्टी बऱयाच असतात. या तयारीसाठी बरेचदा वेळही मिळतो किंवा आपण काढतो; पण देवाचं बोलावणं अचानक येतं. तिथं कशाचीही तयारी करावी लागत नाही. देव तुम्हाला क्षणभराचाही वेळ देत नाही. सर्व काही इथंच सोडावं लागतं! फक्त चांगलं कर्म बरोबर येतं, पण त्याचा विचार आपण करतच नाही.  

ली का तयारी? या प्रश्नाला वेगवेगळय़ा पार्श्वभूमीनुसार वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात. या तीन शब्दांच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे संपूर्ण मानवी जीवन कहाणी आहे. एकदा योगासनांच्या वर्गात वर्ग सुरू असताना सरांनी विचारले की, जर या क्षणी तुम्हाला मुंबईला जायचे आहे, तर काय तयारी कराल? लागलीच निघायचे आहे? सारा वर्ग क्षणभरात अवाक् झाला. काय बरोबर न्यावं! काय सोडावं! अनेक प्रश्नचिन्हे प्रत्येकाच्या चेहऱयावर उमटत होते. सर मात्र सर्वांची होणारी तारांबळ निरखत होते. माझी मैत्रीण जरा स्थिर विचारांची आहे. ती लागलीच म्हणाली, सर सर्वात पहिले तर मी माझी सारी औषधं बरोबर घेईन. कारण तब्येत चांगली  असणं सर्वात महत्त्वाचं आहे. आरोग्यम् धनसंपदा! सर हसले आणि म्हणाले, ‘आणखी कोण?’ सर असा प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक जण काही ना काही उत्तर देत होते! एकेकाचं उत्तर ऐकून सर मिश्किलपणे हसत होते. झाली का तयारी? असा शेवटचा प्रश्न विचारून क्षणभर चूप झाले.

सर्वांची उत्तरं थोडय़ा फार फरकाने योग्य होती. सर म्हणाले, ऐका. देवाकडे असंच अचानक जावं लागतं! कशाचीही तयारी करावी लागत नाही. देव तुम्हाला क्षणभराचाही वेळ देत नाही. सर्व काही इथंच सोडावं लागतं! फक्त चांगलं कर्म बरोबर येतं. त्याचा विचार आपण करतच नाही. भौतिक गोष्टींचा विचार आपण करत असतो. असो! असेच देवाकडे त्यानं बोलावलं की जावं लागतं. त्यासाठी मनाची तयारी करा. ओमकार प्राणायाम याने मन स्थिर होतं! त्याची तयारी करा. खरंच आहे… ही तयारी आपण कुणीच करत नाही। साधं चार दिवस कुठे गावाला जायचं तर किती तरी दिवस आधीपासून आपण तयारी करतो, पण शेवटचं गंतव्य! त्याची तयारी नाही करत!

“अचानक गेले हो! वय नव्हतं जाण्याचं! त्यांच्या जाण्याची अशी वेळ येईल अशी कल्पनाच नव्हती, मन तयार नाही या गोष्टी स्वीकारायला’ अशा अनेक प्रसंगी आपण तयारी या शब्दाचा वापर करतो. सामानाची तयारी, मनाची तयारी असे अनेक शब्दप्रयोग आपण वापरतो.

झाली का तयारी? हा प्रश्न लग्नासंदर्भात फार आनंदानं विचारला जातो. नाही हो अजून खूप व्हायची आहेत कामं. उत्साहानं आणि आनंदानं ही तयारी सुरू असते. कपडे, दागिने, वस्तू इत्यादी इत्यादी… वेळ पुरत नाही, पैसा पुरत नाही आणि शेवटपर्यंत तयारी संपत नाही. तसंही आजकाल चार-चार दिवसांची लग्नं असतात. त्याची तयारी तर खूपच असते. भौतिक आणि दिसण्याची सर्व तयारी होते. होत नाही ती किंवा महत्त्वपूर्ण वाटत नाही ती तयारी म्हणजे मानसिक तयारी. नवीन वातावरण, नवे नातेसंबंध यांच्याशी योग्य तो समन्वय साधण्याची तयारी! ती मात्र कोणीच करत नाही. त्याविषयी बोललं पण जात नाही. खरी तयारी सोडून बाकी तयारी जय्यत झालेली असते. वास्तविक हीच तयारी खूपच महत्त्वाची असते मुलीसाठी. नवीन वातावरणात होणारा बदल. जरी आधी प्रियकर असला तरी नातं बदलतं. पत्नी वगैरे नाही, पण अधिकाराची भावना प्रबळ असते. मुलींप्रमाणे मुलांना त्याच्या घराच्या लोकांना घरात नव्यानं येणाऱया सुनेला सांभाळून घ्यायची तयारी करावी लागते. आमची सून आम्हाला मुलीसारखीच आहे, या वाक्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही. ते होऊ शकत नाही. त्यापेक्षा जे नातं आहे तेच नातं उत्तमरीत्या फुलवणं असं म्हणून त्याचे आपल्या मनाची तयारी करावी. ही तयारी उभयपक्षी हवी.

झाली का तयारी? डॉक्टर आलेले आहेत, हा प्रश्न सुतिकागृह किंवा नार्ंसगहोममध्ये नेहमी विचारला जातो. ही पण एक तयारी! नवीन बाळाच्या आगमनाची तयारी. आतलं म्हणजे ओटीतील वातावरण खूप आनंदाचं असतं. पेशंट थोडासा घाबरलेला असतो. पहिली वेळ असेल तर अधिकच. बाहेरचे वातावरण खूप आनंदाचे असते. आजी-आजोबा यांच्या चेहऱयावर एक अधिरेपणा असतो. कान सगळे आतल्या आवाजाकडे लागलेले असतात. त्याचा आवाज कानावर पडताच, काय झालं डॉक्टर? मुलगा की मुलगी? हलक्या आवाजात पण विचारतो बाळाची आई कशी आहे? येणारा जीव सगळी नाती आपल्या सोबत घेऊन येतो. ही पण तयारी तेवढीच महत्त्वाची असते. यापेक्षा वेगळं वातावरण वेगळय़ा प्रकारच्या संदर्भातदेखील असतं. कधी एखादा अपमान कधी हृदयविकारचा झटका! याही वेळी हाच प्रश्न विचारला जाता. प्रसंगानुरूप डॉक्टरांचं वागणं, समजावणं बदलतं, म्हणूनच झाली का तयारी? या प्रश्नात जीवनांचे विविध अर्थ आहेत.

या सर्व तयारींसाठी, अवस्थांसाठी, आपली मानसिकता बदलती असते. ही तयारी ज्याची त्यालाच करावी लागते. मदत जरूर मिळते, पण मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते.

शेवटी उरते ती फक्त एक तयारी. झाली का तयारी? बाहेर घेऊया त्यांना? आता घरात कल्लोळ असतो. रडारड असते. फक्त आपण शांत असतो. आपल्याला आज काहीच तयारी करायची नसते. आपल्यासाठीची तयारी इतर करत असतात. जसं जन्माला येताना काहीच सामानाची तयारी आपल्याला करावी लागत नाही तसंच निर्वाणाचीही तयारी आपल्याला काहीच करावी लागत नाही. यावेळी उलट आपल्याला काय आवडतं ते आठवून आर्वजून केलं जातं! ‘अरे त्यांना ना मोगऱयाची फुलं फार आवडायची’ असं कुणी म्हटलं की लागलीच धावपळ करून शेवटासाठी मोगऱयाचा हार शोधला जातो. मानली तर सगळी मजा असते. एक गोष्ट मात्र नक्की, वाढत्या वयात आपल्यानंतर कोणाला काय द्यावे यासाठी मृत्युपत्राची तयारी मात्र जरूर करावी. म्हणूनच की काय? योगा क्लासमध्ये विचारल्या गेलेला प्रश्न विचार करायला लावणारा आहे. त्या एका प्रश्नाने इतके सारे रामायण विचारांतून उद्भवले. खरंच आहे. साधासा प्रश्, झाली का तयारी? रोजच्या दिनचर्येत कितीतरी वेळा हा प्रश्न कोणी आपल्याला विचारत असतं, नाहीतर आपण कोणाला तरी विचारत असतो. पण या एकाच प्रश्नाचे किती ठिकाणी किती वेगळे अर्थ आहेत ना?