
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयू) मधील हल्ला निषेधार्हच असून सध्या देशातील अस्वस्थता वाढतच चालली आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विश्वास हिरावून घेतला आहे. त्यामुळे साहित्यिकांसह सगळेच हतबल आहेत, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित भरोसा सेलच्या पहिल्या वर्धापनदिनासाठी ढेरे उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ढेरे म्हणाल्या, असंतोषविरुद्ध आवाज उठविण्यासाठी लोक एकत्र येत आहेत. तरूणाई जागी झाली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. सध्या देश, धर्म, जात, वंश, प्रदेश अशा सर्वच पातळींवर भेदाचे राजकारण केले जात आहे. या परिस्थितीसाठी राज्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे याबाबतीत सगळे सत्ताधारी सारखेच आहेत, कुणा एकाचे नाव घेता येणार नाही. साहित्यिक, विचारवंतांनी यासंदर्भात भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र हा वर्ग देखील दुफळीने ग्रासला असल्याची खंत ढेरे यांनी व्यक्त केली आहे.
भरोसा सेलमुळे पीडित स्त्रिया, ज्येष्ठ नागरिकांना एकाच छताखाली सेवा मिळत असल्याने आनंद आहे. पोलीस ब्रीदवाक्यनुसार काम सुरु आहे. समुपदेशन कार्यकर्ते यांनी सांगितलेले अनुभव आणि माणसांना मदतीचा हात भरोसा देणारा आहे, असे त्यांनी कार्यक्रमात नमूद केले. यावेळी भरोसा सेलच्या अधिकारी उपस्थित होत्या.


































































