आसाराम बापू पुन्हा तुरुंगाबाहेर, उच्च न्यायालयाने ६ महिन्यांचा अंतरिम जामीन केला मंजूर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला मोठा दिलासा मिळाला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला वैद्यकीय कारणास्तव सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजय प्रकाश शर्मा आणि न्यायमूर्ती संगीता शर्मा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

याआधी २७ ऑगस्ट रोजी आसारामचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते की, आसारामची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला सतत वैद्यकीय सेवेची आवश्यकता नाही. दरम्यान, आसारामला राजस्थानमधील जोधपूरमधील एका अल्पवयीन मुलीवर आणि गुजरातमधील अहमदाबादमधील एका आश्रमात एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.