डिजिटल वारी अनुभवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरीची वारी झालेली नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या परीने वारीच्या परंपरेचे जतन करत आहे. यात टेक्नोसॅव्ही असलेली तरुण पिढी मागे कशी राहील. पुण्यात शिकणाऱया मल्टीमीडिया एनिमेशनच्या आठ विद्यार्थ्यांनी डिजिटल वारी उपक्रम राबवला आहे. यात व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठलाच्या विटेपासून ते हृदयापर्यंतचा प्रवास वारीच्या रूपात दाखवण्यात आला आहे.

पिक्सस्वॅड आणि कलातीर्थ यांनी एकत्र येऊन डिजिटल वारी साकारली आहे. यात ओम भरमगुंडे, हर्षल वाळके, ओंकार जंगम, संकेत पतके, राजेश पाटील, ओम संगवार, आशुतोष नवाळे, हृषिकेश भाबड या विद्यार्थांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रसाद सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 50 डिजिटल पेंटिंग साकारले आहेत. या डिजिटल पेंटिंगचा अडीच मिनिटांचा थ्रीडी प्रोजेक्शन व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा यू-टय़ूब व्हिडिओ 17 जुलै रोजी लाँच करण्यात आला. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ ही शेतकऱयाची भावना म्हणजे वारी. डॉक्टर, परिचारिका यांचे समाजासाठीचे कार्य म्हणजे वारी. तर पोलीस, हवालदार यांची शिस्त म्हणजे वारी. देहापासून विदेहापर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजे वारी आणि याची अनुभूती म्हणजे विठ्ठल अर्थात मोक्ष… याच भावना या व्हिडिओतून मांडण्यात आल्या आहेत. या उपक्रमात लहानथोर, संत, स्त्राr- पुरुष यांच्यासह देवरूपी माणासांचा म्हणजेच पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शेतकरी यांचाही समावेश केलेला आहे, असे ओम भरमगुंडे याने सांगितले.