ऑस्ट्रेलियाकडून सिडनीही फत्ते; इंग्लंडच्या बॅझबॉलचा सिडनीतही फज्ज, ऑस्ट्रेलियाचा अॅशेसवर 4-1 ने शिक्का

अ‍ॅशेस म्हणजे काही केवळ क्रिकेटची मालिका नाही; ती इंग्लंडसाठी ऑस्ट्रेलियात आली की सुरू होणारी वार्षिक परीक्षा. यंदाही अ‍ॅशेस प्रश्नपत्रिकाच अवघड निघाली. अखेर पाचवी सिडनी कसोटीही 5 विकेट्सनी फत्ते करत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या बॅझबॉलचा 4-1 असा धुव्वा उडवत अॅशेसची आणखी एक मालिका जिंकली आणि इंग्लंडला पुन्हा एकदा ‘होमवर्प अपुरा’ असा शेरा देऊन घरी पाठवले.

बुधवारी जेकब बेथेलने झुंजार खेळी करून इंग्लिश क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. त्याच्या जिगरबाज खेळीमुळे इंग्लंडने 160 धावांचा पाठलाग करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले. म्हणायला ते आव्हान निश्चितच सोपे होते. पण ऑस्ट्रेलियाने थोडा मसाला घातलाच. पाच विकेट्स पडल्या, प्रेक्षकांची धाकधुक वाढली, इंग्लंडला क्षणभर वाटले – ‘अरे, काहीतरी होणार!’ पण हा भ्रम फार काळ टिकला नाही. कॅमेरून ग्रीन आणि अॅलेक्स पॅरी यांनी अखेरची औपचारिकता पूर्ण केली आणि इंग्लंडच्या आशेचा शेवटचा धागाही तुटला. ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सनी सिडनी फत्ते केले आणि अॅशेसच नव्हे तर सिडनीही हमारा है दाखवून दिले.

या कसोटीचा भावनिक क्षण म्हणजे उस्मान ख्वाजाची अखेरची एण्ट्री. इंग्लंडने दिलेला गार्ड ऑफ ऑनर, ख्वाजाची शांत चाल आणि लगेच त्याची विकेट. क्रिकेट किती निर्दयी असते याचा वेगवान धडा. 88 कसोटींच्या कारकीर्दीचा शेवट सहा धावांत झाला असला तरी अ‍ॅशेस विजयाच्या मिठीत तो गोडच ठरला.

मार्नस लाबुशेनला 20 धावांवर देवाची कृपा झाली; पण देवही कधी कधी ‘आता पुरे’ म्हणतो. 37 धावांवर अनावश्यक धाव काढता तो रनआऊट झाला आणि ऑस्ट्रेलिया 121/5. इंग्लंड आणि त्यांच्या चाहत्यांना वाटले, मेलबर्नची पुनरावृत्ती? पण सिडनीने लगेच सांगितले, इतपं सोपं नाही. पॅरी आणि ग्रीनने  आणखी ट्विस्ट होऊ दिले नाहीत. सामना लवकर संपवला.

याआधी इंग्लंडचा दुसरा डाव 342 धावांत गुंडाळण्यात आला. जेकब बेथेलने 154 धावांची झुंज दिली. जेकब हा भविष्यात मोठा खेळाडू होऊ शकतो, हे त्याने सिद्ध केले. पण एकटा बेथेल अ‍ॅशेस जिंकू शकत नाही, हे इंग्लंडला पुन्हा उमगले. मिचेल स्टार्पने 31 विकेट्स घेत ‘मालिकावीरा’चा पुरस्कार जिंकला. ट्रव्हिस हेड ‘सामनावीर’ ठरला.

ही मालिका इंग्लंडसाठी धक्कादायक ठरली. पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड या पहिल्या तिन्ही कसोटींत हार. मग मेलबर्नमध्ये 18 कसोटींनंतर मिळालेला विजय म्हणजे फक्त जखमेवर लावलेली पट्टी. सिडनीतील पराभवानंतर मात्र ‘बॅझबॉल’वर, तयारीवर आणि प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलमवर मायदेशी प्रश्नांचा भडिमार होणार, हे नक्की.

ऑस्ट्रेलियाने हा अ‍ॅशेस पराक्रम जॉश हेझलवूडशिवाय, पॅट कमिन्स केवळ एका कसोटीत खेळत असतानाही केला. जवळपास 8.6 लाख प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली. कारण अ‍ॅशेस म्हणजे फक्त क्रिकेट नाही, तो एक वार्षिक सोहळा आहे.