
भाजपमध्ये जर रेती माफिया येणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. महसूल बुडवणारे लोक महसूल मंत्र्यांसोबत राहतात, हे मनाला वेदनादायी ठरतं, अशा शब्दांत भाजप आमदार आशीष देशमुख यांनी आज थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.
महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणारे भाजपचा दुपट्टा गळ्यात घालून फिरत आहेत. हजारो कोटींचा शासनाचा महसूल बुडवला आहे. ज्यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अशा लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे, असा आहेर दिला.
आमच्यावर भरोसा नाही का?
गुंडगिरी करणारे, अवैध धंदे चालवणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून देणार आहेत का? आमच्यावर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल आशीष देशमुख यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांचे नाव घेत केला. दोन दिवसांत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे पक्षप्रवेश रद्द करा अन्यथा महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह करू, असा इशाराही देशमुख यांनी दिला.
भाजपमधूनच बोंबाबोंब होताच पक्ष प्रवेश रद्द
नागपूर जिह्यातील सावनेर येथील नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांच्या पक्ष प्रवेशावरून भाजपमधूनच बोंबाबोंब सुरू होताच जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी अखेर हे प्रवेश रद्द केले आहेत. बावनकुळे यांचा या पक्षप्रवेशाशी कुठलाही संबंध नाही. जिल्हा स्तरावर गैरसमजातून हे दोन्ही पक्ष प्रवेश झाले होते, अशी सारवासारव कुंभारे यांनी केली आहे.






























































