
>> आशिष निनगुरकर, [email protected]
जीवनातील आनंद शोधावा लागत नाही. तो कायम आपल्यासोबत असतो. फक्त त्या आनंदाला अनुभवता आले पाहिजे.
जीवनाचा खरा आनंद हा कोणत्याही बाह्य गोष्टींमध्ये नसतो, तर तो आपल्या मनातच असतो. आपण दिवसभर ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, त्या आपल्या आनंदाचा भाग बनतात. त्यामुळे आपण आपले विचार सकारात्मक ठेवले पाहिजेत. आपल्याला आवडतील ती कामे करणे आणि त्या कामातून स्वतसाठी आनंद शोधणे महत्त्वाचे. जीवनात छोटे-छोटे क्षण हेच खरे सुख देतात. तसेच इतरांना मदत करण्यामध्येही अनोखा आनंद मिळतो. त्याने आपले जीवन अधिक समृद्ध होते. जीवन जगत असताना सध्याचा चालू असलेला प्रत्येक क्षण स्वीकारून त्याचा आनंद व अनुभव प्रत्येकाला घेता आला पाहिजे.
आपण रोज काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. जीवनात ज्ञान आणि अनुभवसुद्धा तितकेच महत्त्वाचे. जीवन जगताना जसे आपल्याला आपले सगळे सगेसोयरे सोबत लागतात तसेच आपल्या जीवनात गुरूचेही स्थान तितकेच महत्त्वाचे. गुरूच्या ज्ञानदानामुळे जीवनात मनाची शांती मिळते. ध्यान किंवा योग साधनेमुळे मन शांत राहते आणि आपल्याला जीवनातील खऱया आनंदाची जाणीव होते.
आपला आनंद हरवतो म्हणजे नेमके काय होते. तर आपली चिडचिड होते. आपल्याला प्रचंड राग येतो. हा रागच आपल्याला सर्वत्र त्रास देत असतो. बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि असुरक्षिततेमुळे आपल्या रागाचा पारा वाढताना दिसत आहे. अगदी किरकोळ कारणावरून त्रागा करण्याच्या, हिंसाचार करण्याच्या घटना घडत आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग आल्यावर आपण एकाग्रता गमावतो. रागामुळे शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. स्वाभाविक गती नष्ट होते. रागाच्या भरात आपण विचारशून्य होतो. विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही. त्यामुळे योग्य-अयोग्यचा फरक जाणवत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे.
रागापासून कुणाचीही सुटका झालेली नाही, हे जितकं खरं आहे त्याहून रागाने कुणाचं भलं झालेलं नाही हे कैकपटीने खरं आहे. तोंडून येणाऱया शब्दांवर आणि हातून घडणाऱया कृतीवर आपला ताबा नसतो. मात्र त्याचे परिणाम चांगले नसतात. शस्त्राने केलेल्या जखमा भरून निघतात, शब्दाने केलेल्या नाही. आजची तरुणाई ही फास्ट युगात जगत असल्याने त्यांना तत्काळ गोष्टी हव्या असतात आणि त्या मनाविरुद्ध झाल्या की त्यांचा राग वाढतो व हा राग अनावर झाला की, त्याचा शेवट हा वाईटच होतो.
अनियंत्रित राग आरोग्य आणि नाती दोन्ही बिघडवू शकतात. राग आला की आपण अनेकदा मनात येईल ते बोलून मोकळं होतो. पण त्याचा नंतर पश्चात्ताप होतो. तेव्हा बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. त्यासाठी इतरांचीही मदत घ्या. राग आलेला असला तरी तुमचे विचार स्पष्ट ठेवा. शांतपणे, सकारात्मक पद्धतीने ते इतरांसमोर मांडा. तुमची काळजी, गरजा, तुमच्या बोलण्यातून, इतरांना न दुखावता सांगा.व्यायाम तुमच्या डोक्यावरील तणाव कमी करायला मदत करतो. परिणामी तुम्हाला राग कमी येतो. आपल्या रागावर नियंत्रण कोण ठेवणार? कारण मन शांत ठेवून लढणारेच भविष्यकाळात युवा शक्तीला क्रांतीज्योत बनवू शकतात आणि खऱया अर्थाने आनंदी राहू शकतात.
सर्वप्रथम आनंदी राहण्यासाठी आजूबाजूचं वातावरण आनंदी असावे. छोटय़ा-छोटय़ा गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करा. इतरांसाठी काहीतरी चांगलं केल्याने आपल्याला समाधानाची भावना निर्माण होते. त्यातून आनंद शोधा.
एखाद्याविषयी मनात राग ठेवणे चुकीचे आहे. कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असते, ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही मात्र मनात त्यांच्याविषयी राग ठेवण्यात अर्थ नाही. वाईट गोष्टी विसरावे आणि आयुष्यात सतत पुढे जात रहावे तरच आपण आनंदी राहू शकतो. आपली आवड, आपले छंद आपण जोपासायला हवे तरच आपण आनंदी राहू. आवडते काम करताना आपल्याला जो आनंद मिळतो तोच आनंद दीर्घकाळ टिकतो. आपली क्षमता काय आहे, आपण कुठे कमी पडतो, ती उणीव भरून काढणे यातच जीवनाचे यश लपलेले आहे आणि जिथे यश आहे तिथे आनंद सापडतो.
कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आपण आनंदी राहतो. कुटुंबातील सदस्य आपल्याला समजून घेतात. मित्रांनासुद्धा आपण आपल्या मनातील गोष्टी सांगू शकतो आणि आपल्या समस्या सोडवू शकतो. सोबतच आपल्या आवडत्या व्यक्तींना वेळ द्या. त्यांच्याशी मनसोक्त बोला. मनसोक्त हसा. हवं ते करा. झालेल्या चुकांचे आत्मचिंतन करा पण वाईट क्षण घेऊन बसू नका. त्यामुळे मन उदास होऊ शकतं.जीवनात येणारे क्षण त्यांना सामोरे जा. आयुष्यात नेहमी पुढचा विचार करा. मागे वळून पाहू नका.



























































