
>> आशीष यावले
[email protected]
चित्रकार आपल्या मनातील भावभावनांना रंग, रेषा आणि विविध आकारांच्या माध्यमातून व्यक्त करीत असतो. या अंतर्विचारांतून साकारलेल्या वीरेंद्र चोपडे या सर्जनशील चित्रकाराच्या रंग कलाकृतींचा अनुभव पुण्यातील मोनालिसा कलाग्राममध्ये घेता येईल.
मनाला समजून घेताना स्वतला ओळखणे आणि त्या संवेदनांना कलाकृतीतून अभिव्यक्त करणे हे कौशल्य चित्रकारांमध्ये अधिक आढळते. चित्रकार आपल्या मनातील भावभावनांना रंग, रेषा आणि विविध आकारांच्या माध्यमातून व्यक्त करीत असतो. अंतर्विचारांतून साकारलेल्या त्या कलाकृती केवळ दृश्यानुभव देत नाहीत, चित्र बघणाऱयांशी संवाद साधतात.
भक्ती, प्रेम, राग, लोभ, दुःख, वेदना, रितेपणा, विरह, वियोग, आशा, अपेक्षा आणि आकांक्षा अशा अवस्थांना निसर्गातील आकारांच्या साहाय्याने चित्रित करण्याची अद्वितीय क्षमता वीरेंद्र चोपडे या सर्जनशील चित्रकारामध्ये आहे. चोपडे यांच्या कलाकृती पुण्यातील मोनालिसा कलाग्राममध्ये भरविण्यात आलेल्या ‘अफोर्डेबल आर्ट एक्झिबिशन’मध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन दि.12 एप्रिलपर्यंत रसिकांना बघता येणार आहे.
फ्लॉवर सेलर- दैनंदिन जीवनातील साध्या प्रसंगांमध्येही एक अंतर्मुख, आध्यात्मिक आणि भावनिक क्षण दडलेला असतो. नेमका तोच क्षण चित्रकाराने पकडून मानवी जीवनातील सहजता, श्रद्धा आणि वास्तव यांच्यातील संबंध उलगडून दाखविण्याचा प्रयत्न ‘फ्लावर सेलर’ या चित्रातून केला आहे. चित्रात फुले विकणारी स्त्राr साकारताना खडबडीत पोतमय चाफ्याच्या पानाला देवाचे रूप दिले आहे. चित्रात आवश्यक घटकांची रचना करताना खाली प्रतीकात्मक मानवाकृती आणि वर निसर्गरूपी देव असे अर्थपूर्ण संयोजन केले आहे. त्यामुळे सृष्टी आणि सृष्टी निर्माता यांच्या नात्यातील भिन्नता अधिक स्पष्ट झाली आहे. चित्रातील साधेपणा आणि सुबक मांडणी हा चित्राचा स्थायिभाव आहे. रंगलेपनात विविध निळ्या रंगछटांमुळे शांततेचा भाव प्रस्थापित झाला आहे, तर पांढऱया, पिवळ्या आणि गडद लाल रंगांच्या आकर्षक चाफ्याच्या फुलांनी प्रसन्नता निर्माण केली आहे.
प्रेयर- चित्रकाराने ‘प्रेयर’ या कलाकृतीत स्वतचे प्रतीकात्मक चित्रण केले आहे. अंतर्मनातून केलेली प्रार्थना शांत आणि मनाला स्पर्शणारी असते. त्यामुळे मानवी आकृतीत ओठ नाहीत. विशेषत चित्र संयोजन करताना आवश्यक तितक्याच घटकांचा वापर करून चित्रकाराच्या मनातील असंख्य इच्छा आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आकृतीच्या हातात फुले दाखविली आहेत. चित्रामध्ये वरच्या भागात देवरूपी चाफ्याचे पान आणि खालच्या भागातील ‘स्त्राr’च्या आकृतीमुळे नजर आपोआपच आकृतीकडून पानाकडे आणि पुन्हा पानाकडून इतर घटकांकडे फिरत राहते. अत्यंत साधी, सोपी रचना आणि मर्यादित रंगसंगती असलेली ही कलाकृती ‘मिनिमलिस्टिक’ वाटते.
स्टे अवे फ्रॉम फ्लॉवर- वाढते शहरीकरण, जंगलतोड, औद्योगिकीकरण, प्रदूषण, संसाधनांचा अतिरेकी वापर आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचा समतोल धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या आशयाचा संदेश देणारी ‘स्टे अवे फ्रॉम फ्लॉवर’ ही कलाकृती अतिशय बोलकी आहे. चित्रात मध्यवर्ती रचना केलेल्या मानवाकृतीसाठी चाफ्याचे पान केवळ निसर्गाचा भाग नाही, तर आसरा, सान्निध्य आणि शांततेचे प्रतीक म्हणून पुढे आले आहेत. ‘फुलांपासून दूर रहा’ हा संदेश कलाकृतीतून देत असताना रक्षणकर्त्यांच्या दृढ उपस्थितीपुढे वाकलेल्या बाणाच्या टोकातील मंदावलेली तीक्ष्णता लक्ष वेधून घेते.
अनटायटल्ड- मानवी अस्तित्व, अंतर्मनाचा शोध आणि मानवाचे निसर्गाशी असलेले नाते या जीवनानुभूतींना ‘अनटायटल्ड‘ या चित्रातून उलगडून दाखविले आहे. पार्श्वभूमीतील मंद चंद्रप्रकाश आणि टिमटिमणाऱया तारांच्या शांत वातावरणात चाफ्याच्या पानावर विसावलेली मानवाकृती फुलाशी संवाद साधताना दिसत आहे. चित्राची रचना करताना खालच्या भागातील मानवाकृती आणि वरच्या भागातील चंद्र आणि ताऱयांमुळे विरोधाभास निर्माण झाला आहे. शांतता, अंतर्मुखता आणि आध्यात्मिक गूढता व्यक्त करण्यासाठी निळ्या रंगछटा, तर नव्या जीवनाची सुरुवात आणि नैसर्गिक ऊर्जेसाठी हिरव्या रंगछटांचा वापर केला आहे. एकूणच माणसाच्या भावविश्वातील गुंतागुंत आणि आत्मपरीक्षणाची प्रक्रिया कलाकृतीमधून प्रकर्षाने जाणवते.
चोपडे हे मुळात संवेदनशील चित्रकार आहेत. त्यांची ही संवेदनशीलता त्यांच्या कृतिशील जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली आहे आणि म्हणूनच त्या अंतप्रेरणेतून जीवनाच्या सर्वांगाला अलगद स्पर्श करणाऱया सुंदर कलाकृती सातत्याने जन्माला येतात.
(लेखक चित्रकलेचे अभ्यासक आहेत.)




























































