भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग – अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांना महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग जडला आहे. या रोगाला त्यांनी स्वतःहून नियंत्रणात न आणल्यास महाराष्ट्रातील जनताच त्यांचा इलाज करेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त केली.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवार जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रामुळे देशाच्या कोरोनाविरूद्धच्या लढयाला सुरूंग लागला, हे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे विधान महाराष्ट्रासाठी धक्कादायक, मानहानीकारक आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे. त्यांची भाषा राजशिष्टाचाराला न शोभणारी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे. राज्यांना कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील लसींचा साठा संपुष्टात येत असल्याने राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्राकडे अधिक लसींची मागणी करण्यात काहीही गैर नाही. केंद्राने यापूर्वी दिलेल्या लसी संपल्या आहेत म्हणूनच महाराष्ट्राला आपली मागणी नोंदवावी लागली. ही मागणी करताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोणतीही राजकीय टीका केली नव्हती किंवा केंद्राला कोणतीही दूषणे दिली नव्हती. तरीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्राची अधिक लसींची मागणी मनाला का लावून घेतली, हा प्रश्न अनाकलनीय आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आपल्या निवेदनात केवळ टक्केवारीच्या आधारे महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना केली. फक्त टक्केवारी जाहीर करण्याऐवजी त्यांनी देशातील कोणत्या राज्यांना किती लसी दिल्या आणि कोणत्या राज्यांनी आजवर किती लसीकरण केले, याची माहिती द्यायला हवी होती. टक्केवारी देताना त्यांनी केवळ महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली या तीनच राज्यांची नावे सांगितली. अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याचे सांगितले. पण त्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत. लोकसंख्या आणि आकारमान कमी असलेल्या काही राज्यांची टक्केवारी कदाचित जास्त असेल. पण त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या टक्केवारीत फारसा फरक नसून, महाराष्ट्राची लोकसंख्या, शासकीय कर्मचायांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ विचारात घेता महाराष्ट्राची कामगिरी इतर राज्यांपेक्षा निश्चितपणे सरस आहे, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जुन सांगितले.