सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा – अशोक चव्हाण

19

सामना ऑनलाईन । परभणी

केंद्र व राज्य सरकाराने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे, असा आरोप करत सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जनसंघर्षयात्रा काढण्यात आली असून या जनसंघर्ष यात्रेतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. काँग्रेसला मोठा जनाधार मिळत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा खासदार अशोक चव्हाण यांनी केला. परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेली टप्पा तीनमधील जनसंघर्ष यात्रा परभणीत दाखल झाली. यावेळी मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते.

यावेळी चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असताना भाजपचे मंत्री परदेश दौरा करण्यात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे या अमेरिका दौरा करत आहेत, असेही ते म्हणाले. व्यासपीठावर खासदार राजीव सातव, आमदार विजय वडेट्टीवार, वजाहत मिर्झा, परभणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर आदी उपस्थित होते. जनसंघर्ष यात्रेमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

प्रास्ताविकात सुरेश वरपुडकर यांनी परभणी जिल्ह्यात पावसाअभावी रब्बीची पेरणी झालीच नाही. पाणीपातळी दिवसेंदिवस तळ गाठत आहे. परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून पीकविमा नुकसानभरपाई आदी शासन देत नाही. सर्व आघाड्यांवर शासन अपयशी ठरले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने संघर्ष यात्रा काढली असल्याचे यावेळी बोलताना सांगीतले. प्रमुख पाहुणे राजीव सातव यांनी केंद्र व राज्य शासनाच्या ध्येय धोरणावर घणाघाती टीका केली.

पंतप्रधान मोदी चोर आहेत. त्यांनी उद्योजकांना 40 हजार कोटी रुपये घेऊन विजय मल्ल्या, निरव मोदी व ललित मोदी यांना देशाबाहेर पाठविले. त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आपली प्रतिक्रिया द्या