
>> अशोक डुंबरे
पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य डॉ. पी. सी. थोरात पाटील. कृषी क्षेत्रातील अनेकविध पातळींवरील संशोधनाचे, वेगवेगळ्या प्रयोगांचे श्रेय त्यांना जाते. कृषीक्षेत्राबाबतची माहिती महाराष्ट्रातील जनमानसांत पोहोचवण्यात दूरदर्शनचा मोठा वाटा आहे. कृषीक्षेत्रातील शिक्षण, शेती व्यवस्था, या क्षेत्रातील अडचणी याचा विस्तृत आढावा घेणारी ही मुलाखत दूरदर्शनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली आणि मोठय़ा प्रमाणात पाहिली गेली. शंभरी पार केलेल्या एका कृषी तज्ञाची ही मुलाखत म्हणूनच पहिली व आगळीवेगळी ठरली.
डॉ. पी. सी. थोरात पाटील हे 1925 साली पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य होऊन गेले. त्या अगोदर सर्व इंग्रज लोक या पदावर विराजमान झाले होते. कृषी महाविद्यालय, पुणे हे इंग्रजांनी 1907 साली स्थापन केले. त्याची प्रचंड मोठी इमारत इंग्रजी पद्धतीने बांधली होती. शेतकऱयाचे उत्पादन वाढावे, शेतीत संशोधन व्हावे यासाठी या कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. सध्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात रेन ट्री जातीची झाडे जी दिसतात ती डॉ. पी. सी. पाटील थोरात यांनी त्या काळात लावली होती. केवढे व्हिजन होते त्यांचे या गोष्टी करण्यामागचे.
डॉ. पांडुरंग पाटील हे कोल्हापूरचे राहणारे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले. कृषी महाविद्यालयातून त्याकाळी बी. आग्री पदवी घेऊन नंतर त्यांनी एमएस्सी केले. अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांनी पीएच.डी. करून डॉक्टरेट पदवी संपादन केली आणि यशस्वीरीत्या भारतातील पहिले नागरिक कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी पोहोचले. अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व असा त्यांचा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही. त्यांची दोन्ही मुले एक आर्मीत तर दुसरा पोलीस दलात उच्च अधिकारी म्हणून कामगिरी बजावत होते.
पहिले चिरंजीव म्हणजे लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात पाटील. युनेस्कोतर्फे व्हिएतनाम युद्धात त्यांनी कैद झालेल्या सैन्याला अतिशय हुशारीने शरण यायला लावले होते. ते कैद्यांच्या कॅम्पमध्ये गेले आणि त्यांना काही कैद्यांना सिगारेट ऑफर करून त्यांची मने जिंकली. कैदी शांत झाले आणि जनरल साहेब सांगतील तसेच त्यांनी केले. त्यांनी कमालीचा मनोधैर्य त्यावेळी दाखवले. दुसरे श्रेय म्हणजे पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए हे पुण्यात आणण्याचे श्रेय लेफ्टनंट जनरल थोरात यांना जाते. त्याकाळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांना जनरल थोरातांनी सल्ला देऊन पुण्याजवळ एनडीए का स्थापन करावी हे समजावून सांगितले.
1981 सालातील गोष्ट असावी. राहुरी कृषी विद्यापीठाने कोल्हापूर येथे जाऊन डॉ. पी. सी. पाटील यांना मानद डॉक्टरेट ही पदवी दिली आणि कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात एक विशेष कार्पाम ठेवला होता. त्यामध्ये त्यांचा सत्कार आणि डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यावेळी डॉ. पी. सी. पाटील यांचे वय 102 वर्षे होते. त्यानंतर काही दिवसांनी कोल्हापुरात जाऊन त्यांची मुलाखत घ्यावी असा मी विचार केला होता. त्याप्रमाणे त्यांच्या दोन्ही चिरंजीवांना भेटून मी चर्चा केली आणि या वयोवृद्ध कृषी शास्त्रज्ञाची मुलाखत घ्यावी असा मानस व्यक्त केला. त्यांनी लगेचंच होकार दिला.
मी आणि माझी टीम कोल्हापूरला दोन दिवस मुक्कामी होतो. आता डॉ. पी. सी. पाटील यांनी शंभरी ओलांडलेली, त्यात त्यांना ऐकायला कमी येत होते. तसेच स्मरणशक्तीसुद्धा कमी झाली होती. त्यांची मुलाखत घेणे हे एक अवघड कार्य होते. परंतु महत्प्रयासाने त्यांची मुलाखत मी स्वत घेतली. त्यांनी आपल्या मुलाखतीत जातीय व्यवस्था, शेती व्यवस्था, शेतीत येणाऱया अडचणी, शिक्षण पद्धती इत्यादीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली. दीर्घायुष्याचे रहस्य उलगडून सांगितले. दोनेक तास मुलाखतीला गेले. कारण ते वयस्कर असल्यामुळे लगेच गोष्टी आठवणे, ऐकायला येणे हे प्रश्न होतेच. पण त्यांनी हळूहळू थांबून थांबून थोडी विश्रांती घेत ही मुलाखत यशस्वीरीत्या रेकॉर्ड केली.
नंतर मुंबई येथे दूरदर्शन केंद्रात संकलन करून त्यांचा पदवी समारंभही त्यात टाकून दूरदर्शनवरून हा कार्पाम प्रसारित केला. त्यावेळी एकच वाहिनी असल्यामुळे महाराष्ट्रात प्रेक्षक वर्ग मोठय़ा प्रमाणात होता. ही मुलाखत लोकांनी मोठय़ा प्रमाणात पाहिली. त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी मला प्रत्यक्ष भेटून माझे आभार मानले. मलासुध्दा ही मुलखावेगळी मुलाखत घडवून आणण्यात माझ्या सर्व टीमचे सहकार्य मिळाले म्हणून हे सहज शक्य झाले. शंभरी पार केलेल्या एका कृषी तज्ञाची मुलाखत ही पहिली व आगळीवेगळी ठरली. एक वेगळे समाधान लाभून मला कृतकृत्य वाटले.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत)





























































