
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार ऍक्शन मोडवर येऊन काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत खरात याच्या शिवनिका संस्थेवरील सदस्यांबरोबरच त्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच खरात यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे शिंदे गटाचे आमदार, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.
खरातसोबत छायाचित्र आहोत म्हणून कुणाला आरोपी करता येणार नाही, मात्र खरातशी संपर्क असणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. चाकणकर या खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्य आहेत, तर केसरकर यांनी स्वतःच ईशानेश्वर मंदिरामुळे खरातशी आपली ओळख झाली ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देवभक्त असल्यामुळे सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिरात जात असल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रकरणात चाकणकर आणि केसरकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.
भोंदूबाबा खरातप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत सविस्तर निवेदन करत खरात याच्या कारनाम्यांची माहिती सभागृहात दिली. खरातच्या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या गुह्याची विशेष तपास पथकामार्फत तसेच नाशिकच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी सदस्यांनी खरातच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांची सखोल चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. खरातचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याचे सांगितले. यामुळे खरात याच्याशी संपर्कात असलेले सर्वचजण पोलीस यंत्रणेच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोबाईल डेटा रिकव्हर
भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमधील डेटा परत मिळवला जात आहे. या डेटातून अशोक खरातच्या संपर्कात कोण होते, त्यांच्यात झालेल्या प्रत्येकाच्या व्यवहाराची चौकशी होईल. ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गर्भवती महिलेवर अत्याचार
खरातने कोपाची भीती दाखवत एका महिलेवर वारंवार बलात्कार केला. नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. लघवी पाजून अघोरी प्रकार केले. फिर्यादी महिलेस दिवस गेल्याने गोळ्या देऊन गर्भपातही केला होता. पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध दिले होते. खरात जे द्रव्य द्यायचा त्या द्रव्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
आत्तापर्यंत 40 कोटींची संपत्ती उघड
खरातची नाशिक, सिन्नर, पुणे, नवी मुंबई अशा ठिकाणी प्लॉट, बंगले, मंगल कार्यालय आदी मालमत्ता आहे. स्वतःचे 12 तोळे, पत्नीचे 20 तोळे सोने अशी एकूण आतापर्यंत 40 कोटी 87 लाख रुपयांच्या बाजारमूल्याची मालमत्ता दिसून आली आहे. यावेळी त्यांनी खरातच्या बँकांच्या खात्यांची माहितीही दिली. खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, दक्षिण आफ्रिका, इथोओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया आदी देशांचा प्रवास केला आहे.
पीडितांचे व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवणार
पीडित महिलांचे व्हिडीओ आणि छायाचित्रे मोठय़ा प्रमाणात समाजमाध्यमातून व्हायरल झाली आहेत. हे व्हिडीओ तिथून काढून टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय ज्या वृत्तवाहिन्यांनी पीडित महिलेची ओळख उघड केली त्या वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
छायाचित्राच्या आधारावर चौकशी नाही
ज्या अधिकाऱ्यांनी खरातला संरक्षण दिले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आणि ज्यांची खरातसोबत छायाचित्रे आहेत त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर, आपण सगळेच राजकारणात आहोत. त्यामुळे कुणाबरोबर केवळ छायाचित्र आहे म्हणून त्याला आरोपी करता येणार नाही, मात्र ज्याच्या विरोधात पुरावा मिळेल त्याला सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.


























































