भोंदू खरातची पत्नी फरार; मुलगा ताब्यात, शिर्डीत चार एकर जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन चार एकर जमीन हडपल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पनासह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या कल्पना खरातचा शोध सुरू असून, अन्य दोघांना अटक झाली आहे. नाशिकमधून खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेण्यात आले आहे.

शिर्डी येथील रावसाहेब गोंदकर यांना कर्ज फेडण्यासाठी खरातने व्याजाने पैसे दिले. त्याबदल्यात त्यांची चार एकर जमीन नावावर करून घेतली. राजकीय प्रभाव असल्यामुळे गोंदकर यांनी तक्रार दिली नव्हती. आता खरातच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पडल्यानंतर गोंदकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक व सावकारी अधिनियमाअंतर्गत भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक तांबे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बावके व सोनवणे यांना अटक करण्यात आली. खरातची पत्नी फरार आहे.

वन विभागाची एंट्री

भोंदूगिरीसाठी खरात याने प्रतिबंधीत वन्यप्राण्यांची शिकार केली असावी, त्यांच्या अवयवांचा वापर केला असेल तर स्वतंत्र चौकशी करावी, असे पत्र वन खात्याच्या अधिकाऱ्याने पोलीस आयुक्तांना दिले आहे.

चार मोबाईल नंबर, 45 नेत्यांशी नियमित संपर्क

भोंदू खरात हा सुमारे 45 राजकीय नेत्यांशी नियमित संपका&त राहायचा, अशी माहिती समोर आली आहे. त्याचे चार मोबाईल नंबर होते. वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांसाठी एक, विशेष भक्त व महिलांसाठी दुसरा, आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी, व्याजाचा व्यवसाय यासाठी तिसरा, तर सर्वसामान्य लोक व भक्तांसाठी चौथ्या मोबाईल नंबरचा तो वापर करीत होता, हे तपासात स्पष्ट झाले आहे. विशिष्ट व्यक्तींचे नंबर त्याने कोडवर्डने सेव्ह केले होते.

डॉक्टरला ट्रस्टी केले

अशोक खरातला पोटाचा आजार असून, एका डॉक्टरने त्याच्यावर दोनवेळा उपचार केले. त्याने या डॉक्टरला त्याच्या शिवनिका ट्रस्टचे विश्वस्त केले. आपले त्याच्याशी केवळ रुग्ण म्हणूनच संबंध आहे, त्याच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार नाही, असे या डॉक्टरने स्पष्ट केले आहे.

खरात आज कोर्टात

खरातला न्यायालयाने एक एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. तो चौकशीला सहकार्य करीत नसल्याने काही वस्तू व गोष्टींचे गूढ वाढले आहे, याचा उलगडा होण्यासाठी आणखी कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कारवाईचा फास

विशेष तपासी पथकाने आता खरातच्या कुटुंबाभोवती कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. नाशिकच्या बंद घरात दडून बसलेला खरातचा मुलगा हर्षवर्धन याला विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या नावावर अनेक मालमत्ता आहेत. मालमत्तेवरून दोन्ही मुलीही कारवाईच्या फेऱ्यात येणार आहेत.