
शहाणपण काही कामाचं नाही. कोणत्याही उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठी वेडं व्हावं लागतं. जे वेडे झाले त्यांच्या हातून उत्तम कलाकृती घडल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी आज केले. नॅशनल लायब्ररी, वांद्रे येथे पाच दिवसीय ‘शब्दोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई आणि गिरणगावातील मराठी माणसाच्या व्यथा, वेदना, जीवन संघर्ष मांडणारे कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने या ‘शब्दोत्सवा’मध्ये रविवारी संध्याकाळी ‘भाकरीचा चंद्र’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. दिग्दर्शक मंगेश सातपुते, कवी आदित्य दवणे, संकेत म्हात्रे, प्रशांत डिंगणकर यांच्यासह ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर आणि अशोक नायगावकर यांनी सुर्वे मास्तरांच्या कवितेचा जागर केला. तर प्रकाशक अशोक मुळे यांनी सुर्वेंच्या आठवणींना उजाळा दिला. नारायण सुर्वे यांच्या कविता सादर करतानाच त्यांच्या सोबतच्या असंख्य आठवणी डॉ. महेश केळुसकर आणि अशोक नायगावकर यांनी सादर केल्या.
सोमवारी ‘शब्दोत्सवा’त प्रेम कवितांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कवयित्री यामिनी दळवी, सुप्रिया हळबे, महानंदा मोहिते आणि मेग मेहेन यांनी आपल्या प्रेम कविता, गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नॅशनल लायब्ररी, वांद्रेचे कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक, माजी अध्यक्ष दीपक पडवळ, कार्यवाह विद्याधर झारापकर उपस्थित होते.
साधेपणा मुंबईतून हरवत चाललाय
आताचे उंच उंच टॉवर पाहिले की, मला जुनी आणि साधी मुंबई हरवल्याची खंत वाटते. मुंबई खूप साधी होती, माणसं खूप साधी होती, साध्या चाळी होत्या, साधी घरं होती. छोटय़ा छोटय़ा घरांमध्ये माणसं सुखाने, आनंदाने नांदत होती. नारायण सुर्वेसुद्धा असेच साधेपणाचे आयुष्य जगले. पद्मश्री जाहीर झाला, जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्यावेळी एका साध्या चटईवर बसून त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. हा साधेपणा सध्या मुंबईतून हरवला आहे. माणसाच्या जगण्यातूनच हरवत चालला आहे, अशी खंत अशोक नायगावकर यांनी व्यक्त केली.






























































