प्रेक्षकांनी चेहरा नाही, काम पाहिलं! अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाटय़ परिषदेचा ‘जीवनगौरव’

‘महाराष्ट्र भूषण’नंतर सलग मिळालेला हा चौथा पुरस्कार. तुम्हा सगळ्यांचे माझ्यावर अपार प्रेम आहे. तुम्ही चेहरा महत्त्वाचा ठरवला नाही, काम पाहिले. त्याचे फलित म्हणजे आजचा जीवनगौरव पुरस्कार होय, असे कृतार्थ उद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले.

अशोक सराफ आणि  रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार आज नाटय़ परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाटय़ मंदिराचा लोकार्पण सोहळादेखील झाला. या वेळी अशोक सराफ म्हणाले, नाटक, सिनेमामध्ये काम करणं सोपं नाही. पण त्याहून कठीण म्हणजे मिळालेली प्रसिद्धी, पैसा टिकवणे. इथे पुढचा विचार केला तरच तुम्ही राहू शकाल. म्हणूनच मी वेगळं करत राहिलो आणि ते तुम्हाला आवडत गेलं.

या वेळी शरद पवार यांनी रंगभूमीला जगवण्यासाठी अपेक्षित धोरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू असे सांगितले.

यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुलाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीचा योग्य विनियोग झालाय. एकही पैसा इकडेतिकडे गेलेला नाही. नाटय़ परिषदेच्या ताब्यात राज्यातील नाटय़गृहे द्या, यशवंत नाटय़ मंदिरप्रमाणे ती चांगली करून दाखवू, असा विचार नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मांडला.

या वेळी 100व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाटय़ परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त – आमदार उदय सामंत, मोहन जोशी, अशोक हांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.

इथेच थांबणार नाही

बाहेरून काम करून आल्यावर घरच्यांची कौतुकाची थाप विशेष असते. अगदी तशीच भावना आज हा पुरस्कार स्वीकारताना होतेय. मागे वळून बघताना आपण काय केलं हा विचार मनात येतो. मी फक्त अभिनय केला, एखादी व्यक्तिरेखा साकारताना ती व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला खूप मिळालं, पण प्रेक्षकांना काय मिळालं हा विचार मनात येतो आणि त्यातून आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते. मी इथेच थांबणार नाही. काम करत राहणार, अशा भावना रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केल्या.

नाटकावर कधी बंधन नको – डॉ. जब्बार पटेल 

नाटकावर उजवे, डावे, मधले असे सगळेच प्रेम करतात. नाटकावर कधी, कुठलीही बंधने असता कामा नयेत, असे डॉ. जब्बार पटेल म्हणाले. पुण्यात शरद पवार यांच्या पाठिंब्याने,  जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग झाला होता. त्याची आठवण डॉ. पटेल यांनी सांगितली. 100व्या नाटय़ संमेलनानिमित्त मुंबईत एक आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सव आयोजित करण्याची अनोखी संकल्पना त्यांनी मांडली. मराठी रंगभूमीच्या बाहेर अन्य राज्यांतील रंगभूमीवर (बंगाली, कन्नड, आसामी रंगभूमी इत्यादी) काय सुरू आहे, परदेशातील स्टेजवर काय चाललंय, याचे शिक्षण युवा कलाकारांना देण्याचा उद्देश या महोत्सवामागे असेल, असे पटेल यांनी सांगितले.