
मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी संगीत क्षेत्रातील एका महान युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त करत आपला शोक अनावर केला आहे. लता मंगेशकर यांच्यानंतर संगीत क्षेत्रातील हा दुसरा मोठा धक्का असल्याचे सांगताना, मराठी संगीताचा खरा ऱ्हास झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आशा भोसले यांच्या आवाजातील वेगळेपण आणि उत्कृष्टतेचा उल्लेख करताना अशोक सराफ म्हणाले की, हा आवाज कधीही विसरता येणारा नाही. केवळ एक महान गायिका म्हणूनच नाही, तर आशा ताई वैयक्तिकरित्या अशोक सराफ यांच्या अभिनयाच्या मोठ्या चाहती होत्या, ही बाब सराफ यांच्यासाठी अत्यंत मोलाची ठरली आहे.
अशोक सराफ यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना एका चित्रपटाच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगितला. एका लावणीच्या रेकॉर्डिंग दरम्यान आशा ताईंनी सराफ यांना केवळ एका शब्दासाठी स्टुडिओत बोलावले होते. गाण्यात ‘काय’ हा शब्द उच्चारण्यासाठी सराफ यांची गरज असल्याचा आग्रह आशा ताईंनी धरला होता. दिग्गज गायिकेसमोर काम करताना सराफ सुरुवातीला काहीसे दडपणाखाली होते, परंतु ताईंच्या आग्रहाखातर त्यांनी तो शब्द रेकॉर्ड केला. क्षेत्रातील भिन्नतेमुळे दोघांच्या भेटीगाठी कमी असल्या, तरीही परस्परांच्या कामाबद्दलचा आदर कायम होता. हिंदी आणि मराठी संगीत विश्वात असा विलक्षण आवाज पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत सराफ यांनी आपल्या लाडक्या गायिकेला श्रद्धांजली अर्पण केली.
संगीत सृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान – श्रीधर फडके
जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून, ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी भावना व्यक्त केल्या.
आशाताईंच्या जाण्याने आपल्याला प्रचंड धक्का बसला असून, आपल्या गाण्याने संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारी एक महान गायिका आज आपल्यात नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. फडके कुटुंब आणि आशा भोसले यांचे नाते अत्यंत जुने आणि कौटुंबिक होते. आशाताईंनी केवळ स्वरच नव्हे, तर गाण्याचे सादरीकरण, त्यातील भाव आणि चेहऱ्यावरील मुद्रा यांचा साक्षात अनुभव आपल्या गायकीतून दिला. गाणे आनंदाचे असो, दुःखाचे असो वा प्रेमगीत, त्या प्रत्येक शब्दाला पूर्ण न्याय देत असत, असे श्रीधर फडके यांनी नमूद केले. लतादीदींनंतर आता आशाताईंच्या जाण्याने संगीत सृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याची हळहळ त्यांनी व्यक्त केली.
आशा भोसले यांच्या अभ्यासू वृत्तीच्या आठवणींना उजाळा देताना श्रीधर फडके म्हणाले की, त्या बाबूजींकडे म्हणजेच सुधीर फडके यांच्याकडे रियाजासाठी येत असत. घरी आल्यावर त्या केवळ संगीतातच रमल्या नाहीत, तर थेट स्वयंपाकघरात जाऊन आईशी गप्पा मारत जेवणाची विचारपूस करत असत. बाबूजींबद्दल त्यांना नितांत आदर होता आणि त्या त्यांना आदराने ‘फडके साहेब’ म्हणत असत. बाबूजींकडून त्या केवळ स्वर शिकल्या नाहीत, तर गातानाचे त्यांचे हावभाव यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. “फडके साहेबांसारखे हावभाव केले की मला त्यांचे गाणे नीट म्हणता येते,” असे त्या मोठ्या मनाने कबूल करत असत. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली सात-आठ गाणी आशाताईंनी गायली आहेत. विशेषतः ‘ऋतू हिरवा’ यांसारखी गाणी गाऊन त्यांनी त्या रचनांचे अक्षरशः सोने केले, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
संगीतातील ‘ध्रुवतारा’ हरपला – महेश काळे
हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील देदीप्यमान तारा निखळल्याची भावना व्यक्त करत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच मनाला मोठी रुखरुख लागली असून, संगीतातील एक मार्गदर्शक ध्रुवतारा हरपल्याचे त्यांनी म्हटले आहे. काल आणि आज गायनाचे कार्यक्रम असल्याने व्यस्त असल्याचे सांगत, प्रवासादरम्यान ही दुःखद बातमी समोर आल्याचे महेश काळे यांनी म्हटले. प्रवासात असतानाच पत्नीशी आशा आत्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा झाली होती, मात्र इतक्या लवकर त्या आपल्याला सोडून जातील याची कल्पनाही केली नव्हती, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
महेश काळे यांनी त्यांच्या आणि आशा भोसले यांच्यातील ऋणानुबंधांना उजाळा देताना सांगितले की, आशाताई त्यांचे गुरु पंडीत जितेंद्र अभिषेकी यांच्या भगिनी होत्या. 90 च्या दशकात त्या जेव्हा अभिषेकी बुवांना राखी बांधण्यासाठी घरी येत असत, तेव्हा त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात अतिथी म्हणून आलेल्या आशाजींसोबत त्यांना दिवसभर मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. अत्यंत आपुलकीने आणि आत्मीयतेने बोलणाऱ्या आशा आत्यांनी त्यांना दुबईला येण्याचे निमंत्रणही दिले होते. “माझं तिथे रेस्टॉरंट आहे, तुम्ही नक्की या, मी तुम्हाला छान खायला घालेन,” असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यानंतर महेश काळे जेव्हा दुबईला गेले, तेव्हा त्यांनी त्यांच्या रेस्टॉरंटचा फोटो काढून आशाताईंना पाठवून दिला होता. अशा आजपर्यंतच्या विविध आठवणींना महेश काळे यांनी उजाळा दिला.
























































