आष्टी तालुक्यासाठी 10 कोटी पीक नुकसान अनुदानाचा पहिला टप्पा प्राप्त

1326

ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार आष्टी तालुक्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. पहिल्या टप्यासाठी 10 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्याचे आठवड्यात वितरण होणार आहे. यामध्ये 74 हजार शेतकऱ्यांचा समावेश असून ही मदत शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके पूर्णता वाया गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 56 हजार 165 हेक्‍टरवरील कापूस, बाजरी, सोयाबीन, तुरचे नुकसान झाले आहे. कृषिसहायक, तलाठी, ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले. तालुका प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानुसार नुकसानभरपाईचा पहिल्या टप्यासाठी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्यात मिळालेला 10 कोटी अनुदानाचा निधी या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार, अशी माहिती तहसीलदार वैभव महेंद्रीकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या