
>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]
प्राचीन भारतातील चंद्रकेतुगड हे बंदर ज्याचे दक्षिण-पूर्व आशिया, भूमध्य प्रदेश तसेच ग्रीको-रोमन जगाशी व्यापारसंबंध होते. पश्चिम बंगालमधील या पुरातत्वस्थळी उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तू, हस्तिदंती वस्तू व पट्टिका याची साक्ष देतात.
चंद्रकेतुगड हे पश्चिम बंगालमधील कोलकात्यापासून सुमारे 35 किमी अंतरावर बिद्याधरी नदीकाठी वसलेले एक प्राचीन नगर होते. पूर्वी बिद्याधरी नदीचा आदि गंगेशी संपर्क असल्यामुळे येथे समुद्रमार्गे सहज वाहतूक शक्य होती. या अनुकूल भौगोलिक स्थानामुळे चंद्रकेतुगड लवकरच एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले आणि त्याचे दक्षिण-पूर्व आशिया, भूमध्य प्रदेश तसेच ग्रीको-रोमन जगाशी व्यापारसंबंध होते. याचे पुरावे म्हणून येथे सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तू, हस्तिदंती वस्तू व पट्टिका महत्त्वाच्या आहेत. गंगा-ब्रह्मपुत्रा नदीप्रणालीतील बदलत्या प्रवाहांमुळे आणि गाळ साचल्यामुळे आज हे स्थळ मुख्य जलमार्गांपासून दूर गेले आहे. सध्या ते बिद्याधरी नदीपासून सुमारे 10 किमी उत्तरेस आहे. या ठिकाणी 3-5 चौ.कि.मी. परिसरात देवालय, हाडीपूर, बेराचांपा, शनपुकूर, झिक्रा इत्यादी गावांमध्ये पसरलेले टेकाडांचे समूह असून त्याभोवती मोठी मातीची तटबंदी आढळते.
खाना-मिहीरर ढिपी येथे एक भव्य विटांच्या मंदिराचा अवशेष सापडला असून तो धार्मिक संकुलाचा भाग होता. पाण्याच्या स्रोतांवर नियंत्रण आणि जलमार्गांची उपलब्धता यामुळे हरिनारायणपूरपेक्षा चंद्रकेतुगड अधिक विकसित व मोठे केंद्र बनले. या स्थळाची वस्ती इ.स.पूर्व चौथ्या शतकापासून सुरू झाली. त्यानंतर मौर्य, शुंग, कुषाण, गुप्त तसेच पाल आणि सेन या राजवटींच्या काळात येथे अखंड वस्ती कायम होती.
मेगॅस्थनीस, टॉलेमी आणि डियोडोरस सिक्युलस यांच्या वर्णनांमध्ये गंगा व तिच्या परिसराचा सविस्तर उल्लेख आढळतो. या प्रदेशाला ‘गंगारिडाई’ असे संबोधले जात असे. मेगॅस्थनीस (इ.स.पूर्व 350-290) यांनी ‘इंडिका’ या ग्रंथात बंगाल प्रदेशाला ‘गंगारिडाई’ असे म्हटले असून त्याची राजधानी कोटलीपारा असल्याचे नमूद केले आहे. पूर्वीच्या उल्लेखानुसार ‘गंगे’ हे बंदर बहुधा चंद्रकेतुगड हेच होते असे मानले जाते. यास पुष्टी देणारा पुरावा म्हणजे येथे मोठय़ा प्रमाणावर सापडलेल्या जहाजाच्या आकृती असलेल्या मुद्रिका होय. या ग्रंथात या प्रदेशाला ‘गंगे’ असे म्हटले असले तरी अभ्यासकांच्या मते तोच गंगारिडाई प्रदेश आहे. भारतीय अभ्यासकांनी गंगारिडाईच्या उत्पत्तीबाबत विविध मते मांडली आहेत.
चंद्रकेतुगड हे दोन टेकाडांमध्ये विभागलेले स्थळ आहे. खाना-मिहीरर ढिपी आणि चंद्रकेतुगड. खाना-मिहीरर ढिपी येथे पालकालीन मंदिर आढळते, तर चंद्रकेतुगड टेकाडावर अजून विस्तृत उत्खनन होणे अपेक्षित आहे. मागील शतकात रस्ते बांधकामाच्या वेळी येथे विटांची रचना उघडकीस आली. स्थानिक रहिवासी तारकनाथ घोष यांनी याकडे लक्ष वेधले, परंतु ए. एच. लॉंगहर्स्ट यांनी या अवशेषांना फारसे महत्त्व दिले नाही. पुढे 1922-23 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पूर्व विभागाने या स्थळाचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला.
यानंतर कोलकाता विद्यापीठाच्या आशुतोष संग्रहालयाने इ.स. 1950-60 च्या दशकात येथे उत्खनन केले. येथे सापडलेल्या रोमन व भूमध्य समुद्राशी संबंधित नाण्यांवरून या स्थळाचा काल इ.स.पूर्व तिसऱया शतकापर्यंत असावा असे मानले गेले. येथे मौर्यपूर्व ते गुप्त काळापर्यंतचे पाच सलग कालखंड आढळले असून प्रत्येक कालखंडात विशिष्ट प्रकारची मृद्भांडी सापडली. येथील घरे मुख्यत माती, लाकूड व बांबूची असून छपरांसाठी कौले वापरली जात होती. 1960 च्या दशकात जहाजाची आकृती असलेली पंचचिन्हांकित नाणी सापडली. तसेच मातीची खेळणी, इंद्र व कुबेर यांच्या पंखधारी हत्तीवरील मूर्ती, मेंढय़ांनी ओढलेल्या रथावर बसलेला अग्नी, शुंगकालीन मेंढय़ावर स्वार असलेली आकृती आणि कुषाणकालीन बैलांनी ओढलेल्या रथाच्या मूर्ती आढळल्या. 2000 साली बिमल बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने येथे लहान प्रमाणात उत्खनन केले, ज्यात विटांचे अवशेष, लाकडी ओंडके, लाल दगडी पासे, मातीचे गोळे व पट्टिकांचे तुकडे सापडले. 2000-03 दरम्यानच्या संशोधनातून इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. 11-12 वे, 15-16 वे शतक आणि आधुनिक काळापर्यंतचा कालक्रम स्पष्ट झाला. इ.स. 11 व्या शतकातील महिषासुरमर्दिनीची दगडी पट्टिका हा एक महत्त्वाचा शोध आहे. तसेच जवळील उत्खननातून 17 व्या शतकातील सुलतानकालीन इतिहासाचे पुरावेही मिळाले.
मौर्यकाळात, विशेषत अशोक यांच्या काळात हे एक समृद्ध नागरी केंद्र होते. येथे तटबंदी व खंदक असल्याचे दिसते. मृद्भांडय़ांवर खरोष्ठी व ब्राह्मी लिपीतील लेख आढळतात. इ.स.पूर्व 700-600 या पूर्वकालीन काळातील एक मोठे प्रार्थनागृहही येथे असावे, जे सामुदायिक उपासनेसाठी वापरले जात असे. चंद्रकेतुगड येथे उत्खनन आणि पृष्ठभागीय संकलनातून मोठय़ा प्रमाणावर पुरावस्तू सापडल्या आहेत. नाणी, मौल्यवान व अर्धमौल्यवान मणी, मृत्तिकावस्तू, दगडी शिल्पे, सुवर्ण नाणी, तसेच हाड, हस्तिदंत आणि लाकडी वस्तू हे महत्त्वाचे शोध आहेत. संपूर्ण परिसर पुरातत्त्वीयदृष्टय़ा समृद्ध असून पुराणकथा व लोकपरंपरेतही या स्थळाला विशेष स्थान आहे.
येथून मोठय़ा प्रमाणावर उत्कृष्ट मृत्तिकाशिल्पे मिळाली असून ती विविधतेने समृद्ध आणि अत्यंत कलात्मक आहेत. मिथुन आकृत्यांच्या पट्टिका येथे सापडल्या असून त्या अहिच्छत्र आणि कौशांबी येथील नमुन्यांशी साधर्म्य दर्शवतात, यावरून या स्थळांमध्ये संपर्क असल्याचे सूचित होते. ही मृत्तिकाशिल्पे मौर्य, शुंग, कुषाण आणि गुप्तकालीन मानली जातात. उत्खननातून मिळालेल्या मृद्भांडय़ांच्या आधारे पुरातत्त्वज्ञांनी त्यांच्या उत्पत्तीचा अभ्यास केला आहे. अनुकूल भौगोलिक स्थान आणि सांस्कृतिक घटकांमुळे चंद्रकेतुगड हे प्रारंभिक ऐतिहासिक काळापासूनच एक महत्त्वाचे नागरी केंद्र म्हणून विकसित झाले. विशेष म्हणजे प्रारंभिक मध्ययुगीन काळातही त्याची भरभराट सुरूच राहिली.
या वस्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या नागरी रचनेतील विविधता. येथे कारागिरीचे विशेषीकरण, व्यापार व वाणिज्य मोठय़ा प्रमाणावर होते. वंग प्रदेशातील जहाज चिन्हांकित नाणी येथे सापडली असून ती सातवाहनकालीन जहाज चिन्हांकित नाण्यांशी साधर्म्य दर्शवतात. बाणगढ, मंगळकोट, तामलुक, हरिनारायणपूर आणि देऊलपोता या ठिकाणांशी गार्नेट, क्वार्ट्झ, कर्नेलियन आणि अगेट मण्यांचा व्यापार चालत होता. इथल्या मृत्तिका शिल्पांवरून इतर स्थळांशी संपर्क असल्याचे दिसते. मुद्रांवरून व्यापाऱयांची उपस्थिती स्पष्ट होते, तर शस्त्रांच्या अवशेषांवरून सैनिकांचीही उपस्थिती सूचित होते. चंद्रकेतुगड हे प्राचीन काळातील महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक होते.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)



























































