‘माणिक रत्न’ पुरस्कार माझ्यासाठी विशेष, अश्विनी भिडे-देशपांडे यांचे प्रतिपादन

‘ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार खरंच आनंददायी आहे. माणिक वर्मा यांच्यासोबत माझे वेगळे नाते होते, त्यामुळे त्यांच्या या ‘स्वरोत्सवात’ माझा हा सन्मान होणे मी भाग्यच समजते,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘पद्मश्री’ अश्विनी भिडे-देशपांडे यांनी केले. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा नुकताच सुप्रसिद्ध तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते ‘माणिक रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘पद्मश्री’ ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाऊंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ म्हणून साजरे केले जाणार आहे. या जन्मशताब्दीचे औचित्य साधत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळय़ानंतर चौरंगचे अशोक हांडे आणि माणिक वर्मा फाऊंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.  माणिक वर्मा यांची एकाहून एक सरस गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी वर्मा यांनी केले. यावेळी वंदना गुप्ते, भारती आचरेकर, अरुणा जयप्रकाशदेखील उपस्थित होते.