Asia Cup 2025 – UAE सोबत खेळण्यास नकार, पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर!

पाकिस्तान आणि UAE यांच्यामध्ये आज (17 सप्टेंबर 2025) दुबईमध्ये सामना होणार होता. परंतु सामन्यापूर्वीच पाकिस्तानने UAE विरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आता आशिया चषकातून बाहेर फेकला गेला आहे. UAE चा संघ आता दोन गुणांसह सुपर- 4 फेरीसाठी पात्र ठरला आहे. जिओ न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. तसेच सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याच टाळलं होतं. त्यामुळे पाकिस्तानने सामना अधिकारी एंडी पाइक्रॉफ्ट यांना यासाठी जबाबदार मानलं आणि ICC कडे तक्रार दाखल केली होती. एंडी पाइक्रॉफ्ट यांना हटवण्याची त्यांनी मागणी केली होती. परंतु ICC ने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली. एंडी पाइक्रॉफ्ट यांना हटवलं नाही तर, UAE विरुद्धचा सामना बॉयकॉट करण्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. मात्र, त्यानंतर पाकिस्तान खेळण्यास तयार झाला होता. परंतु आता सामन्याच्या एक तास आधीच पाकिस्तानने UAE विरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. PCB ने पाकिस्तानच्या खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितलं आहे. याचा थेट फायदा UAE ला झाला असून UAE चा संघ सुपर-4 साठी आता पात्र ठरला आहे.