सफर-ए-यूएई – एक लढत – अनुभव विरुद्ध उमंग! 

>>संजय कऱ्हाडे

मंगळवारी बांगलादेशकडून केवळ आठ धावांनी पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानचा कप्तान राशिद खान रडवेला झालेला दिसला. पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. दुःख केवळ त्याचा साथीदार जन्नत धावचीत झाल्याचं नव्हतं. आपली चूक सुधारता न आल्याचं होतं. ऐनवेळी हातातला सामना निसटून गेल्याचं होतं!

आज मात्र राशिद मैदानावर अधिक निर्धाराने उतरेल. कारण गाठ सातत्याने खेळणाऱ्या श्रीलंकेशी आहे. शिवाय, आजचा सामना हरणं म्हणजे स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की.

श्रीलंकेचा संघ मात्र दोन सामने जिंकून सुपर-फोरमध्ये पोचलेला आहे. निसांका, मेंडीस आणि कप्तान असालंका यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि टिंगटाँगला दणक्यात चीत केलंय. हसरंगा आणि तिकसानाच्या फिरकी जोडीने प्रतिस्पर्धी संघाला रोखलंच, शिवाय बळीही चटकावले.

अफगाणिस्तान मात्र अपेक्षा करेल ती झादरान, गुरबाझ आणि पहिल्याच सामन्यात वीस चेंडूंत अर्धशतकाची लडी लावणाऱ्या उमरझायकडून. तशीच सीम गोलंदाज फारुकी, नवीनकडून आणि फिरकीबाज स्वतः राशिद खान आणि वीस वर्षीय डावरा नूरकडून.

शेख झायेद स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला सीम करते अन् नंतर किंचित संथ होऊन फिरकीला साथ देते असं दिसलंय. श्रीलंकेसाठी टॉस तितका महत्त्वाचा ठरणार नाही. त्यांच्याकडे परिणामकारक सीम आणि फिरकी गोलंदाज आहेत. त्यांची आघाडीची आणि मधली फळीसुद्धा तय्यार आहे.

अफगाणिस्तानसाठी मात्र टॉस श्वास अडकवणारा ठरेल. प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला तर गुरबाझ, अटेल, झादरान, उमरझाय, नैब, नबी साऱ्यांनाच
बॅटला एखाद्या शस्त्रासारखं वापरावं लागेल. किमान एकशे साठच्या पुढची धावसंख्या उभारून फिरकीची कमाल दाखवावी लागेल.

हा सामना असेल अनुभव विरुद्ध उत्साहाचा. सातत्य विरुद्ध जिद्दीचा, स्थापित विरुद्ध उमंगभऱ्या दिलावरांचा!