आशियाई क्रिकेटचा राजा कोण? हिंदुस्थान-बांगलादेशमध्ये आज फायनल जंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, दुबई

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने अजेय राहत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत फायनलपर्यंतचा प्रवास केला. दुसरीकडे बांगलादेशाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे हिंदुस्थान-बांगलादेश संघांमध्ये उद्या, 28 सप्टेंबरला फायनलची जंग रंगणार आहे. या घडीला तरी हिंदुस्थानचे पारडे जड वाटतेय यात शंकाच नाही. मात्र बांगलादेशाचा दिवस असल्यास या संघात कुठल्याही संघाला हरवण्याची क्षमता आहे हे अवघ्या क्रिकेटविश्वाने पाहिले आहे. त्यामुळे उद्या ‘टीम इंडिया’ सातव्यांदा आशियाई क्रिकेटचा राजा होणार की बांगलादेशाच्या रूपाने नवा विजेता मिळणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.

दुखापतीचे ग्रहण

हिंदुस्थानला हरवण्याची बांगलादेशाला नेहमीच खुमखुमी असते. पाकिस्तानवरील विजयाने मनोबल उंचावलेले बांगलादेशी क्रिकेटपटू आता विजेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानला हरविण्याचे स्वप्न बघत असतील. मात्र प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे बांगलादेशच्या संघाची घडी थोडी विस्कटली आहे. तमीम इक्बालचा हात फ्रॅक्चर झाल्याने तो आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यातच आता अष्टपैलू शाकिब अल हसनच्या बोटाला दुखापत झाल्याने तोही उद्याच्या अंतिम लढतीस मुकणार आहे.

गोलंदाजीवर मदार

बांगलादेशकडे मुस्ताफिजुर रहमान, रुबेल हुसैन व मशरफे मुर्तजा या वेगवान गोलंदाजी त्रिकुटापुढे हिंदुस्थानी फलंदाजीचा कस लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. फलंदाजीमध्ये मुशफिकुर रहीम व महमुदुल्लाह बांगलादेशसाठी नेहमीच संकटमोचक ठरलेले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांना डेथ ओव्हरमध्ये सावध गोलंदाजी करावी लागणार आहे.

सातव्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज

अफगाणिस्तानविरुद्ध बरोबरीत सुटलेल्या लढतीत पाच खेळाडूंना विश्रांती दिलेला हिंदुस्थानचा संघ उद्या किताबी लढतीत पूर्ण ताकदीनिशी मैदानावर उतरेल. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने स्पर्धेत हिंदुस्थानला सुरेख सलामी देण्याची जबाबदारी चोखपणे बजावली. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा व कुलदीप यादव अशा वैविध्यपूर्ण गोलंदाजीमुळे हिंदुस्थानच्या गोलंदाजी ताफ्याला बळकटी मिळाली आहे. फक्त मधल्या फळीत अंबाती रायडू, केदार जाधव व अनुभवी महेंद्रसिंग धोनी यातील कोणीतरी मोठी खेळी करण्याची जबाबदारी उचलायला हवी.

उभय संघ

हिंदुस्थान-रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दीपक चहर.

बांगलादेश-मशरफे मुर्तजा (कर्णधार), मोहम्मद मिथुन, लिट्टन दास, मुशफिकुर रहीम, अरुफुल हक, महमुदुल्लाह हुसैन, मोसद्देक हुसेन, नजमुल हुसैन, मेहदी हसन मिराज, नजमुल इस्लाम अपू, रुबेल हुसैन, मुस्ताफिजुर रहमान, अबू हैदर रोनी, सौम्या सरकार, मोमिनुल हक, इमुरुल कायेस.

थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्टस्’वरून सायंकाळी 5 वाजल्यापासून.