खड्डेमुक्तीसाठी दिव्यांगांचे भीक मागो; जमलेले सहा हजार एमएसआरडीसीला देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहापूर-सापगाव या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याविरोधात शहापूर-सापगाव संघर्ष समिती व एकलव्य दिव्यांग फाऊंडेशनने आज भीक मागो आंदोलनाचे हत्यार उपसले. भीक द्या… भीक द्या शहापूर-सापगाव रस्त्यासाठी भीक द्या… असे म्हणत दिव्यांग बांधवांनी सहा हजार रुपये जमा करून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनातून जमा झालेली रक्कम एमएसआरडीसीला देण्यात येणार आहे.

शहापूर-सापगाव हा रस्ता एमएसआरडीसीअंतर्गत आहे. गेल्या आठ वर्षांपासून निधीअभावी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथून जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. यापूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण, रास्ता रोको, आंदोलने करण्यात आली. मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर दिव्यांग बांधवांनी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी धो धो पावसात भीक मागो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनातून जमा केलेली रक्कम शहापूर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एमएसआरडीसीला देण्यात येणार आहे.

हाडे खिळखिळी
शहापूर-सापगाव मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तब्बल आठ पावसाळे खड्ड्यातूनच जावे लागत आहे. या दीड किमी अंतरावर खड्ड्यांची संख्या हजारात आहे. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असूनदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या नाकर्ते कारभाराचा फटका वाहनचालकांना बसत आहे. खड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची हाडे खिळखिळी होत आहेत.