
आसाममध्ये येत्या 9 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला धोबीपछाड करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यात निवडणुकीची तयार सुरू असतानाच रविवारी तिनसुकिया जिल्ह्यातील जगुन येथील आसाम पोलीस कमांडो छावणीवर संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम पोलिसांचे चार कमांडो जखमी झाले आहेत.
शनिवारी मध्यरात्री 2 वाजता आसाम-अरुणाचल प्रदेश सीमेजवळ हा हल्ला झाला. पोलीस छावणीवर पाच ग्रेनेड फेकल्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या जखमी झालेल्या कमांडोंना उपचारासाठी दिब्रुगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही आणि जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती देण्यात आली नाही. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी गस्त वाढवली असून आजूबाजूच्या वनक्षेत्रात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.
























































