सापाला क्रिकेट सामना पाहायचा होता, म्हणून तो मैदानावर आला! आसाम क्रिकेटच्या सचिवांचं अजब विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत गुवाहाटी येथे झालेल्या टी-20 सामन्यादरम्यान विचित्र घटना घडली होती. एकिकडे हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी मिळवली. पण, या सामन्याच्या पहिल्या सत्रात टीम इंडिया फलंदाजी करत असताना चक्क एक भला मोठा लांबलचक साप मैदानात घुसला होता. त्याला पाहून सर्व खेळाडूंची तारांबळ उडाली होती.

पहिल्या सत्रात सातवी ओव्हर पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना मैदानावर साप दिसला. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू वायन पार्नेल याने तो सारप पाहिला व तत्काळ पंचांना कळवले. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर ग्राऊंडस्टाफ तत्काळ मैदानावर आले व त्यांनी काठी व बादलीच्या सहाय्याने त्या सापाला पकडले. त्यानंतर काही वेळातच सामना पुन्हा सुरू करण्यात आला.

आता या प्रकारावर आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजित सैकिया यांची प्रतिक्रिया आली आहे. सैकिया म्हणाले की, मला खात्री आहे की, हा साप क्रिकेटचा सामना पाहायला आला होता. त्याला खेळाडूंना जवळून पाहायचं होतं. सामन्यादरम्यान अनेक चौकार आणि षटकार सुरू होते. ते पाहायला म्हणूनच तो मॅचच्या मध्ये घुसला. जेव्हा आमच्या ग्राऊंड स्टाफने त्याला पकडलं तेव्हा तो निश्चितच दुःखी झाला असणार, असं सैकिया म्हणाले आहेत. सैकिया यांच्या या अजब विधानामुळे सारेच बुचकळ्यात पडले आहेत.

याच सामन्यादरम्यान दुसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला होता. त्याचं कारण साप नसून एका लाईट टॉवरची बत्ती गुल होणं, हे होतं. त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटं सामना थांबवायला लागला. सैकिया यांनी यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मला वाटत नाही की ही खूप मोठी घटना आहे. एक एमसीबी ट्रिप झाला होता, पण त्याला ताबडतोब दुरुस्त करण्यात आलं. आमच्याकडे एलईडी यंत्रणा नाही. ती एक ऑल मेटल सिस्टीम होती. त्यामुळे आता आम्ही आता ती बदलणार आहोत, असंही सैकिया यावेळी म्हणाले.