
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई उपनगर जिह्यात मतदारांची संख्या 72 लाख 26 हजार 826 एवढी असून या मतदारांना मतदानाचा हक्क बजवण्यासाठी 7 हजार 397 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मुंबईच्या उपनगर जिह्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांतेतेत, सुरळीत व निःपक्षपणे पार पाडण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून यासाठी सुमारे 60 हजार कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत आहेत तर याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती मुंबई उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी (प्रभारी) विवेक गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.
सर्वात मोठा जिल्हा
मतदारसंघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिह्यात 26 विधानसभा मतदारसंघांचा समावेश.
मतदारांची संख्या – 72 लाख 26 हजार 826
मतदान केंद्राची संख्या – 7 हजार 397
पुरुष मतदारांची संख्या – 39 लाख 29 हजार 232
महिला मतदारांची संख्या – 32 लाख 97 हजार 67
इतर मतदारांची संख्या – 727
कर्मचाऱयांची संख्या – 60 हजार


























































