
आपल्या तीन दशकांतील पोलीस सेवेत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रँचमध्ये तब्बल दोन दशके उत्कृष्ट कामगिरी बजावणारे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश रमेश तावडे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक बहाल करून गौरव करण्यात आला आहे.
मुंबई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश रमेश तावडे यांनी गेल्या 30 वर्षांत मुंबई पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मुंबई पोलीस आयुक्त व मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रमुखांनी महेश तावडे यांच्या उत्क़ृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना 350 पेक्षाही अधिक बक्षिसे बहाल केली आहेत. पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव केला आहे. आता तर राष्ट्रपतींनी त्यांच्या देदीप्यमान सेवेची दखल घेऊन त्यांना गुणवत्तापूर्वक सेवेचे पोलीस पदक बहाल केले आहे.
महेश तावडे 1993 साली महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. दत्ता पडसळगीकर, राकेश मारिया पोलीस आयुक्त असताना महेश तावडे यांनी एका आयएएस दाम्पत्याच्या पल्लवी पुरकायस्था या मुलीच्या मारेकऱ्याला कश्मीरमध्ये फिल्डिंग लावून पकडले. इंडियन मुजाहिदीन या संघटनेच्या उच्चशिक्षित अतिरेक्यांना जेरबंद केले. मालाड, कुरार येथे चार तरुणांचे गळे चिरणाऱ्या उदय पाठक या खतरनाक आरोपीला अटक केली. निरज ग्रोवर या सिनेदिग्दर्शकाच्या खुन्यांना अटक केली. 125 च्या वर अग्निशस्त्रांचा साठा जप्त केला. अपहरण करण्यात आलेल्या 75 मुलींची सुटका केली. सांगलीत धाड घालून चार कोटींचा ड्रगचा साठा हस्तगत केला. जाँबाज पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या नेतृत्वाखाली 10 गँगस्टरना चकमकीत ठार मारले. गोरेगाव येथे आठ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीस अटक करून वरिष्ठांची शाबासकी मिळविली. अशा या मुंबई क्राइम ब्रँचमध्ये दोन दशकांपेक्षाही अधिक काळ कार्यरत असलेल्या महेश रमेश तावडे या एसीपीला राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने मुंबई क्राइम ब्रँचमधील त्यांचे सहकारी समाधान व्यक्त करीत आहेत.






























































