
राज्याच्या सहकार विभागात सहाय्यक निबंधकांची वानवा आहे. मंजूर 225 पदांपैकी तब्बल 103 पदे रिक्त असून मेअखेर जवळपास आणखी 100 पदे रिक्त होणार आहेत. त्याचा सहकार विभागाच्या कामकाजावर थेट परिणाम होत आहे.
सहकार विभागात जिल्हा उपनिबंधकांनंतर सहाय्यक उपनिबंधक हे महत्त्वाचे पद असून त्यांचा थेट सहकारी संस्थांच्या कामकाजाशी संबंध येतो. राज्यात प्रत्येक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दोन आणि तालुका स्तरावर एक सहाय्यक निबंधक कार्यरत आहे. नवीन सहकारी संस्थांच्या नोंदणी करणे, कार्यरत असलेल्या संस्थांच्या कामावर वॉच ठेवणे, वार्षिक ताळेबंद पत्रक तपासणे, संस्था सहकार कायद्यानुसार चालते की नाही ते पाहणे, ग्राहक सभासदांच्या तक्रारी निकाली काढण्याची कामे केली जातात. पण सहकारी संस्था गट ब या संवर्गातील सहाय्यक निबंधकांची मार्च अखेर 103 पदे रिक्त असून निवृत्तीमुळे मेअखेर जवळपास 100 पदे रिक्त होणार असल्याची माहिती सहकार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सदर पदे रिक्त असल्याने सहकारी संस्थांच्या कामावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच नवीन संस्थांची नोंदणी काहीशी रोडावली आहे.
एकाच अधिकाऱ्याकडे दोन-दोन ठिकाणाचा पदभार
सहाय्यक निबंधकांची शंभरहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच सहाय्यक उपनिबंधकाकडे दोन-दोन कार्यालयांचा पदभार आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. तसेच दोन तालुक्यांतील सहकारी संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेणे, तपासणी करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे सहाय्यक उपनिबंधक या पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती देण्याची मागणी होत आहे.

























































