कल्याणच्या शाळेत मुख्याध्यापिका, व्यवस्थापकाचे अश्लील चाळे; संतप्त पालकांची पोलीस ठाण्यावर धडक

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे साई न्यू इंग्लिश स्कूल या खासगी शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा शाळेच्या आवारात अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. या दोघांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मात्र याप्रकरणी फक्त एनसी दाखल केली आहे.

साई न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी हरीहरन आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश चव्हाण यांचा शाळेच्या आवारात अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख आशा रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडक दिली. आमची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. जर असे अश्लील प्रकार शाळेच्या कार्यालयात आणि परिसरात घडत असतील तर याचा विपरित परिणाम मुलांवर होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी पालकांनी केली.