लोकनायक अटलबिहारी वाजपेयी यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

सामनाा ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे महान सुपुत्र, माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी आज पंचत्वात विलीन झाले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला. आपल्या लाडक्या लोकनायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी राजधानीत जनसागर उसळला होता. यावेळी अटलजींविषयी जनमानसात असलेल्या अपार प्रेमाचे विशाल दर्शनच घडले. अंत्यदर्शनासाठी देशभरातून आलेल्या चाहत्यांची अलोट गर्दी उसळली. स्मृतिस्थळावर भडकलेल्या ज्वाळा आकाशाकडे झेपावू लागल्या तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. त्याचवेळी पावसाचा शिडकावा झाला… लोकनायकासाठी धरतीही रडली आणि आभाळही रडले!

गुरुवारी सायंकाळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त आल्यापासूनच अवघा देश शोकसागरात आहे. गुरुवारी रात्रीपासूनच 6, कृष्णा मेनन मार्ग निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी उसळली होती. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक राजकीय पक्षांचे नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि चाहत्यांनी अटलजींच्या पार्थिवाचे निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. सकाळी नऊ वाजता 6, कृष्णा मेनन मार्ग निवासस्थानातून फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या वाहनातून अटलजींचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यात आले. या मार्गावर प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. भाजप मुख्यालयाबाहेर नागरिकांची अलोट गर्दी उसळली हाती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत भरून गेला. देशभरातून आलेल्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या लोकनायकाचे अंत्यदर्शन घेतले.

– राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्करप्रमुख बिपिन रावत, नौदलप्रमुख सुनील लांबा, हवाई दल प्रमुख बिरेंद्रसिंग धनुआ यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.

‘लोकनायक’ अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेण्याकरिता अखेरचा निरोप देण्यासाठी देशविदेशातील व्हीव्हीआयपींची गर्दी उसळली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, सरसंघचालक मोहन भागवत, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माकपनेते सीताराम येचुरी, सपा नेते मुलायमसिंग यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यांमधील नेते, खासदार, आमदारांनी अंत्यदर्शन घेतले. विदेशातील अनेक नेत्यांनीही अंत्यदर्शन घेतले.

मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी
– ‘स्मृतिस्थळ’ येथे अंत्यसंस्कारावेळी गर्दी उसळली होती. व्हीव्हीआयपींची संख्या मोठी असल्यामुळे लष्कराकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
– ‘स्मृतिस्थळा’बाहेर चाहत्यांच्या ‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, अटलजी तुम्हारा नाम रहेगा’च्या घोषणा सुरू होत्या.
– अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाभोवती गुंडाळलेला तिरंगा नात निहारिकाकडे सोपविण्यात आला त्यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
– वैदिक मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला.

हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांची दिल्लीत वाजपेयींना श्रद्धांजली
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेऊन हजारो रेल्वे कर्मचाऱयांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. वाजपेयी हे 1959 ते 1971 या बारा वर्षांच्या कालखंडात ‘ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ या संघटनेचे अध्यक्ष होते. रेल्वे कर्मचाऱ्यांशी असलेले ते नाते वाजपेयी यांनी अखेरपर्यंत जपले होते. 1999 साली ते पंतप्रधान होते. त्यावेळी रेल्वे कामगार नेते टी. एन. बाजपेयी यांच्या पुतळय़ाच्या अनावरणासाठी ते लखनौला आवर्जून गेले होते असे ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले.

वाजपेयी देशवासीयांच्या अंतःकरणात कायम राहतील!
‘अटलजी, अवघा हिंदुस्थान तुम्हाला सॅल्यूट करत आहे’ असे सांगतानाच वाजपेयी हे प्रत्येक देशवासीयाच्या अंतःकरणात कायम राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्लॉग’वर म्हटले आहे. वाजपेयी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांचे राष्ट्रासाठीचे योगदानही असामान्य असेच होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. माझ्यासाठी तर ते आदर्श, गुरू आणि रोल मॉडेलच होते, असे मोदी यांनी ब्लॉगवर नमूद केले आहे.

मंत्रालयात अटलजींना श्रद्धांजली
स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना मंत्रालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्यदूत, करिष्ठ शासकीय अधिकारी, तिन्ही सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते. अटलबिहारी वाजपेयी हे सहस्त्रकातील एक रत्न होते. त्यांचे योगदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. संवेदनशील, कवीमनाच्या अटलजींनी देशहितासाठी प्रसंगी वज्राहून कठोर निर्णय घेतले. ‘भारत जमीन का तुकडा नही, जीता जागता राष्ट्र पुरुष है’ असे श्रद्धेय अटलजी नेहमी म्हणायचे. त्यांचे विचार देशावर प्रेम करणाऱया भारतमातेच्या सुपुत्रांसाठी प्रेरणादायी ठरतील, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीकार यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अबू आझमी, मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, मनिषा चौधरी, निरंजन डावखरे, अमीन पटेल, लोकायुक्त न्या. एम. एल. तहलियानी, मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्य दूत, तिन्ही सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षण, विधी व न्याय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांच्या वतीने अटलजींना अखेरचा निरोप दिला. देशाच्या या महान नेत्याचे अंत्यदर्शन घेतल्यावर राष्ट्रपतीही भावुक झाले होते.

उत्तर प्रदेशातील 75 जिल्हय़ांत अस्थिविसर्जन
वाजपेयी यांच्या अस्थींचे उत्तर प्रदेशच्या 75 जिल्हय़ांत विसर्जन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केली. उत्तर प्रदेश ही वाजपेयींची कर्मभूमी होती.

जनसागर उसळला
– आज सकाळपासूनच राजधानी दिल्लीतील रस्त्यांवर जनसागर उसळला होता.
– दुपारी एक वाजता भाजप मुख्यालयापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या गाडीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव ठेवले होते. पार्थिवाभोवती तिरंगा गुंडाळला होता.
– भाजप मुख्यालय ते ‘स्मृती स्थळ’ हे सात किलोमीटर अंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मुख्यमंत्री, मंत्री आणि लाखोंचा जनसागर पायी चालत होते.
– रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाखो चाहते आपल्या लाडक्या तपस्वी नेत्याला अखेरचा निरोप देताना पुष्पवृष्टी करीत होते. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले.
– दुपारी चार वाजता अटलजींचे पार्थिव ‘स्मृती स्थळ’ येथे आणण्यात आले. तेथे निशब्द शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.
– लष्कराच्या तिन्ही दलांच्या 300 जवानांनी यावेळी मानवंदना दिली.

देश-विदेशातील मान्यवरांकडून आदरांजली
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वाँगचूक, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करजाई, श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरीललिया, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप गयावाली, पाकिस्तानचे माहिती-प्रसारणमंत्री सईद जाफर अली यांच्यासह अनेक देशांच्या राजदूतांनी हिंदुस्थानच्या या महान सुपुत्राचे अंत्यदर्शन घेतले.

मॉरिशसने वाजपेयी यांच्या निधनाबद्दल तीक्र दुःख व्यक्त केले आणि आपला राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, अटलजींनी संपूर्ण जगात सन्मान प्राप्त केला. रशिया आणि हिंदुस्थानच्या राजकीय संबंधांना अधिक मजबूत करण्याचे काम त्यांनी केले आणि ते कायम स्मरणात राहील. श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी, एक महान मानवतावादी आणि श्रीलंकेचा सच्चा दोस्त आम्ही गमावला आहे, असे ट्विट करून वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे हिंदुस्थानने महान राष्ट्रीय नेता गमावला आहे. आम्ही चांगले मित्र होतो ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. – दलाई लामा, तिबेटचे धर्मगुरू

अटलबिहारी वाजपेयी हे काव्य आणि संगीताचे जाणकार असे रसिक हेते. त्यांनीच मला पहिल्यांदा ‘रसराज’ ही उपाधी दिली. मला अनेक पुरस्कार, सन्मान मिळालेत पण वाजपेयी यांनी दिलेला ‘रसराज’ हा सन्मान मला अधिक भावला. सुनीता बुद्धिराजा यांनी शब्दांकित केलेल्या माझ्या आत्मचरित्राचे नावच ‘रसराज पंडित जसराज’ असे ठेवले आहे. – पंडित जसराज, शास्त्रीय गायक

वाजपेयी हे हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री बनले तेव्हा मला दिल्लीत बांगलादेशचा राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यातील योगदानासाठी वाजपेयी आमच्या कायम स्मरणात राहतील. त्यांना बंगाली संगीताची आवड होती. – अब्दुल हसन मोहम्मद अली, परराष्ट्रमंत्री, बांगलादेश

हिंदुस्थान हा प्रत्येकाचा देश असावा आणि पाकिस्तानसोबत मैत्री करावी असे अटलबिहारी वाजपेयींना वाटत होते, पण पाकिस्तानशी मैत्रीचे प्रयत्न सफल होऊ शकले नाहीत. आता पुढील काळात त्यांचे ते स्वप्न मोदी सरकार आणि इम्रान खान सरकार पूर्ण करतील अशी आशा आहे.– डॉ. फारुख अब्दुल्ला, नेते नॅशनल कॉन्फरन्स.

वाजपेयी हे हिंदुस्थानी उपखंडातील आदरणीय नेते होते. त्यांच्या निधनाने दक्षिण आशियातील राजकारणात मोठीच पोकळी निर्माण झाली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वाद आहेत, पण सीमेवर दोन्ही देशांना शांतता हवी आहे. शांतता प्रस्थापित करणे हीच वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल – इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान

वाजपेयी हे महान कवी होते. त्यांच्या अनेक कविता मी गायल्या आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठाच धक्का बसला. ते आपल्यातून निघून गेलेत यावर विश्वासच बसत नाही. आपल्या सभोवताली ते आहेत असेच वाटते. – पद्मजा फेणाणी-जोगळेकर, शास्त्रीय गायिका