मुंबईकर अथर्व राणेने लडाखकरांची मने जिंकली, जगातील सर्वात उंचीवरील अर्धमॅरेथॉनमध्ये रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्रसपाटीपासून सुमारे 14,000 फूट उंचीवर आयोजित लडाख आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या अर्ध मॅरेथॉन प्रकारात मुंबईकर युवा धावपटू आणि कणकवलीचा सुपुत्र अथर्व रजनीश राणे याने 21.1 किमी अंतर 2 तास 50 मिनिटांत पूर्ण करीत रौप्यपदकाची कमाई करीत लडाखवासीयांची मने जिंकली. लेह येथे दरवर्षी लडाख आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉनचे आयोजन केले जाते.

जगातील सर्वात उंचावर (समुद्रसपाटीपासून 14,000 फूट) होणारी ही एकमेव मॅरेथॉन असून यात प्रमुख शर्यतीसह अन्य गटांतील दौडीत जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आदी देशांतील तब्बल सहा हजारहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. अथर्व राणे याने पहिल्याच प्रयत्नात सर्वात कठीण मानली जाणारी जगातील अर्ध मॅरेथॉन पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. तो परेल मुंबई येथील नारायण मेघाजी लोखंडे श्रम विज्ञान संस्थेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लेहचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून लडाख मॅरेथॉनच्या विविध गटांतील दौडींचा शुभारंभ केला.