‘स्प्रे गँग’पासून सावधान! ATM मधून लुटली पाच लाखांची रक्कम

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि विंचूर येथे पहाटे अवघ्या दोन तासात चोरट्यांनी दोन एटीएम फोडून पाच लाखांची लूट केली.

पिंपळगाव-बसवंतच्या चिंचखेड चौफुलीवरील युको बँकेच्या एटीएममध्ये आज पहाटे सवाचारच्या सुमारास 20 ते 30 वयोगटातील तीन चोरटे घुसले. त्यांनी सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले, त्यातून 25 हजार 400 रुपये काढून पोबारा केला. एटीएम सेंटरमधील एका छुप्या कॅमेऱ्यात हे तीनजण असल्याचे दिसून आले. बँक व्यवस्थापक रवीकिरण त्रिकोटी यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या चिंचखेड चौफुलीवर युको बँकेच्या एटीएमपासून जवळच आणखी तीन बँकांचे एटीएम आहेत. पिंपळगाव पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांना सुरक्षारक्षक नेमण्याची नोटीसही दिली होती. मात्र, बँकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने चोरीची ही घटना घडली.

याचपद्धतीने अवघ्या दोन तासांनंतर येवला-विंचूर रस्त्यावर विंचूर येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली. सकाळी सवासहा ते साडेसहाच्या दरम्यान दोन चोरट्यांनी सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचा फवारा मारून गॅस कटरने मशीन फोडले, त्यातून 4 लाख 75 हजारांची रोकड लंपास केली. बँक व्यवस्थापक स्वप्नील अरूण सोनजे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या