
एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेला दणक्यात सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशी डॉमिनिक थीमने स्टेफनोस सितसिपासला हरवून दमदार सुरुवात केली. नोवाक जोकोविच व राफेल नदाल या स्टार व दिग्गज टेनिसपटूंनी सोमवारी प्रतिस्पर्ध्यांना हरवले. डॅनील मेदवेदेव याने अॅलेक्झॅण्डर झ्वेरेववर सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.
नोवाक जोकोविच याने गट टोकियो 1970च्या लढतीत डिएगो श्वार्त्झमन याला 6-3, 6-2 अशा फरकाने हरवले. राफेल नदाल याने गट लंडन 2020 मध्ये आंद्रेय रुबलेव याला 6-3, 6-4 अशा फरकाने नमवले. त्यानंतर डॅनील मेदवेदेव याने गट टोकियो 1970 मध्ये अॅलेक्झॅण्डर झ्वेरेवला 6-3, 6-4 असे पराभूत केले. डॅनील मेदवेदेव याचा एटीपी फायनल्समधील हा पहिलाच विजय ठरलाय. याआधी गेल्या मोसमात त्याला तिन्ही लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोरोनाचा फटका
ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. पण मेलबर्नमध्ये कोरोनावर नियंत्रण अद्याप मिळवता आलेले नाही. त्यामुळे ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेआधी होणाऱया सराव स्पर्धा व्हिक्टोरिया येथे आयोजित करण्याचा मानस आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पण व्हिक्टोरिया प्रमुखांकडून यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. दरम्यान, कोरोनामुळे क्रीडाविश्वावरही परिणाम झालेले आहेत. यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा नियोजित वेळेप्रमाणे व्हायला हवी असे नोवाक जोकोविचला वाटते.




























































