
सामना प्रतिनिधी, ठाणे
अँटिक पॅलेसमधील बाउन्सर्स तसेच वेटर्सनी पहाटे चारच्या सुमारास दोन भावांवर हल्ला करीत बांबूने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हितेश भादेकर व दीपेश भादेकर अशी जखमी भावांची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे घटना घडून 24 तास उलटले तरी अद्यापि हल्लेखोरांना अटक करण्यात आली नसून यानिमित्ताने बारमध्ये दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच पहाटे चारपर्यंत हा बार उघडा कसा काय, असाही सवाल विचारण्यात आला.
हितेश व दीपेश हे दोघे सिव्हिल हॉस्पिटलजवळील तावडे बिल्डिंगमध्ये राहतात. दीपेश हा आपला मित्र गणेश जाधव याला त्याच्या घरी सोडायला पहाटे आपल्या दुचाकीवरून गेला होता. त्याला सोडून दीपेश हा परतत असताना तीन पेट्रोलपंपजवळील अँटिक पॅलेस येथून जात होता. त्याच्या दुचाकीने बारजवळ उभ्या असलेल्या व्हॅगनार गाडीला धडक दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या बारमधील वेटर्स तसेच बाउन्सर्सनी धाव घेऊन दीपेशला काsंडून ठेवले आणि बेदम मारहाण केली.
हितेश भादेकर याला या मारहाणीबाबत समजताच त्याने लगेच घटनास्थळी धाव घेत वेटर्स व बाउनर्सना जाब विचारला. दादागिरी करणाऱया या कर्मचाऱयांनी हितेश याच्यावरही बांबूने व लोखंडी रॉडने मारहाण केली. हितेश व भाऊ दीपेश या दोघांनाही बेदम मार बसला असून हितेश याला 33 टाके पडले आहेत. त्याच्या भावाच्या पाठीलाही बेदम मार लागला असून या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
बारवाल्यांना कोणाचे अभय?
रात्री दीड वाजेपर्यंत बार उघडे ठेवण्याची परवानगी असताना अँटिक पॅलेस बार पहाटे चारपर्यंत कसा उघडा होता.. या मागे कोणाचे अभय आहे, असा सवाल शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी केला आहे. दोन भावांना बेदम मारहाण करणाऱयांची नावे सांगूनही त्यांना अद्यापि का अटक केली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
summary- attack on bar waiters at thane




























































