इम्तियाज जलील यांच्या ‘तिरंगा रॅली’त आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

2113

संभाजीनगरमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या माहिती अधिकारी कार्यकर्त्यावर रविवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरात प्रजासत्ताकदिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप नदीम राणा यांनी केला आहे.

माहिती अधिकारी कार्यकर्ते नदीम राणा यांनी काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. धर्माच्या आधारावर निवडणूक लढवली म्हणून याचिका दाखल केली होती. या रागातून आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. प्रजासत्ताकदिनानिमित्त खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगरात तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी जलील यांच्या कार्यकर्त्यांनी नदीम राणा यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी गाडीमध्ये नदीम राणा आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. ‘टीव्ही-9’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

नक्की काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताकदिनानिमित्त खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगरात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली संभाजीनगरहून खुल्ताबादकडे जात होती. रॅली दौतलाबादमध्ये पोहोचली असता माहिती अधिकारी कार्यकर्ते नदीम राणा यांची गाडी या ठिकाणी आली. रॅलीतील काही कार्यकर्त्यांनी त्यांना ओळखले आणि गाडीवर हल्ला केला. शेकडो कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक करून तोडफोड केली.

आपली प्रतिक्रिया द्या