लातूरच्या कारागृहात कैद्याचा ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर येथील जिल्हा कारागृहात उदगीर येथून गुन्ह्यात अटक केलेल्या कैद्यांना अटक करण्यासाठी आणले होते. यावेळी एका कैद्याने तीक्ष्ण ब्लेड सारख्या तुकड्याने स्वतःच्या डाव्या हाताच्या पोटरीवर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बब्रुवान निळकंठराव तुडमे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, न्यायालयीन कोठडी दिल्याने वैभव व्यंकट सांगोळे आणि शुभम प्रकाश जाधव या आरोपींना लातूर येथील जिल्हा कारागृहात दाखल करण्यासाठी घेऊन आले. यावेळी त्यांना जेलच्या अधिकाऱ्यांच्या कक्षातील टेबल समोर घेऊन गेले असता शुभम प्रकाश जाधव याने माझ्यावर खोट्या केसेस टाकत आहेत, मी मरतो असे म्हणून ब्लेड सारख्या धारधार तुकड्याने डाव्या हाताच्या पोटरीवर स्वतःवर वार करून घेत दुखापत केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी व कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या हातातील धारधार तुकडा काढून घेतला आणि उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. उपचारानंतर पुन्हा त्याला जिल्हा कारागृहात जमा करण्यात आले आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून शुभम जाधव याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.